दंडाच्या ई-चलनाचे SMS पाहून पुणेकर हैराण; आकारणीवरून सर्वपक्षीय नेते पोलीस आयुक्तांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:54 AM2021-12-10T10:54:07+5:302021-12-10T10:54:24+5:30
सध्या वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत थांबून नागरिकांकडून वाहतूक नियम मोडल्याच्या पूर्वीच्या घटनांबाबतची सध्या वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत थांबून नागरिकांकडून वाहतूक नियम मोडल्याच्या पूर्वीच्या घटनांबाबतची हजारो रूपयांची दंड आकारणी सुरू केली आहे. यावेळी संबंधिताचा गाडीचा क्रमांक मोबाईल अँपमध्ये टाकून जुन्या दंडाची रक्कम सांगून त्यांच्या वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे
पुणे : शहरातील लाखो नागरिकांना वाहतूक पोलिसांनी पाठविलेल्या हजारो रुपयांच्या दंडाच्या ई-चलन एसएमएसच्या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची सोमवारी (दि. १३) भेट घेणार आहेत.
सध्या वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत थांबून नागरिकांकडून वाहतूक नियम मोडल्याच्या पूर्वीच्या घटनांबाबतची हजारो रूपयांची दंड आकारणी सुरू केली आहे. यावेळी संबंधिताचा गाडीचा क्रमांक मोबाईल अँपमध्ये टाकून जुन्या दंडाची रक्कम सांगून त्यांच्या वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे. यामुळे पुणेकर हैराण झाले असून, याविरोधात आंदोलन उभारण्यासाठी गुरुवारी (दि. ९) सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली होती़ या बैठकीस ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, भाजपचे संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, आरपीआयचे अँड मंदार जोशी, शिवसेनेचे राजेंद्र शिंदे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, पतित पावनचे दिनेश भिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांची भेट घेणार असून वाहतुक पोलिसांनी घोळक्याने उभे राहून सुरू केलेली ही दंड आकारणी बंद करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुक कोंडी प्राधान्याने सोडवावी, नागरिक त्यांच्यावर आकारण्यात आलेला दंड भरतील. अशावेळी वाहतूक पोलिसांनी आधीच कोरोनाने त्रस्त असलेल्या नागरिकांवर दंड वसुलीचा तगादा लावू नये, अशी मागणी करण्यात येणार आहे.