- नम्रता फडणीस
पुणे : सणासुदीला केवळ हौस म्हणून जेवणानंतर पान खाण्याची जागा, आता काहीशी दैनंदिन सवय झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याच्या संस्कृतीत विडा खाण्याचा ट्रेंड रुजला आहे. याचं कारण विडा (पान) खाणे हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. म्हणूनच मराठी-हिंदी गाण्यांमध्ये पान चर्चेत राहिले आहे. ‘कळीदार कपुरी पान कोवळं छान केशरी चुना, रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा’, ‘पान खाये सैय्या हमारो...’, ‘खईके पान बनारसवाला...’ अशी असंख्य गाणी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली.
हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुणेकरांची पावले पानांच्या दुकानांकडे वळत असल्याचे चित्र रात्रीच्या वेळेस सर्वत्र पाहायला मिळत आहे. शहरात पान शौकिनांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, महिलावर्गही त्याला अपवाद नाही. पूर्वी अगदी राजे राजवाड्यांपासून खानपान झाले, की मुखशुद्धीसाठी विडा खाण्याची पद्धत चालत आली आहे.
नागवेलीच्या पानावर काथ, चुना, सुपारी हे आवश्यक घटक ठेवून पानाची पुरचुंडी करून विडा बनविला जातो. याशिवाय, आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार विड्यात कंकोळ, कापूर, खसखस, खोबरे, जायपत्री, तंबाखू, बडीशेप, बदाम, लवंग, वेलदोडा, आदी घटक समाविष्ट केले जातात. देशाच्या विविध भागांमध्ये विड्याचे अनेकविध प्रकार आढळतात.
कुठून येतात पाने?
कलकत्ता, बनारस आणि मगई या पानांच्या जातींचे पीक पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांत घेतले जाते. मद्रास पान तमिळनाडू येथून येते. वेलीवरची ही पाने रेल्वेने देशभरात पाठविली जातात. जानेवारी ते जून दरम्यान आंध्र प्रदेशच्या पानांचा हंगाम असतो. महाराष्ट्रातही सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात गावरान पान पिकते. घरी खाण्यासाठी तसेच पूजेसाठी याच गावरान पानाचा वापर केला जातो.
कलकत्ता पानाला अधिक पसंती :जुन्या पानाची जागा आता कलकत्ता आणि बनारस पानाने घेतली आहे. कलकत्ता पान गडद हिरवे आणि चवीला जरा गोड असते. या पानापासून फुलचंद पानाचे असंख्य प्रकार पानाच्या ठेल्यावर उपलब्ध असतात. बनारस पान पिवळसर आणि चवीला तुरट असते. उत्तर भारतीय कामगारांच्या वसाहतींजवळ बनारस पान सहज मिळते. मात्र, पुणेकर बनारस पानाऐवजी कलकत्ता पानाला पसंती देतात. सध्या कलकत्ता पान २८० रुपये शेकडा दराने उपलब्ध आहे.
...या पानांची व्हरायटी उपलब्ध
प्रत्येकाची पान खाण्याची आवड ठरलेली असते. सध्या नॉन स्टिकी आणि नॉन टोबॅकोच्या पानांना अधिक मागणी आहे. त्यानुसार साधं पान, मसाला पान, रामप्यारी, मगई पानांसह खास महिला व आबालवृद्धांसाठी गोड पानांचे फ्लेव्हरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात मगई चॉकलेट, ड्रायफूट, रोस्टेड अल्मंड, ब्लँक करंट, रोझ, स्ट्रॉबेरी पानांची जास्त क्रेझ आहे. फायर पान, आइस पानांनादेखील विशेष मागणी आहे. तरुणाईची पसंती कलकत्ता-बनारस, एकशे वीस तीनशे, साधा फुलचंद, फुलचंद किमाम, रिमझिम या पानांना अधिक मागणी असल्याचे पान व्यावसायिकांनी सांगितले.
शहरात १५ हजारांपेक्षा अधिक पान व्यावसायिक
पुण्यात मराठी लोकांसह भैया लोकही पानांच्या व्यवसायात आहेत. पुण्यात बाहेरून आलेल्या लोकांच्या पान टपऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. प्रत्येकाचा स्वत:चा एक ग्राहक वर्ग ठरला आहे. पुणे जिल्हा पान असोसिएशन अंतर्गत जवळपास १५ हजार पान व्यावसायिकांची नोंद आहे. त्यापेक्षा अधिक पान व्यावसायिक कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
पान खाण्याकडे पूर्वी पुरुषवर्गाचा कल अधिक असायचा. आता महिलांमध्येही हा ट्रेंड वाढला आहे. महिलांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक पान खाऊ शकतील यासाठी अधिकाधिक पानांची व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- भार्गव मोरे, पान व्यावसायिक
विडा खाणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा पान खाण्याकडे ओढा वाढला आहे. पानांच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. वीस रुपयांपासून पाने उपलब्ध आहेत. पानांच्या पसंतीनुसार आणि त्याच्यातील घटकांचा विचार करून किंमत ठरते.
- शरद मोरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा पान असोसिएशन
श्रावणापासून दिवाळीपर्यंत पूजेच्या पानाला सर्वाधिक मागणी असते. गोड म्हणून मगई पान खाल्ले जाते. बागवान, तांबोळी आणि काही हिंदू कुटुंबीय पानाचा व्यवसाय करतात. ओल्या कपड्यात कलकत्ता व बनारस पान आठ दिवस, तर गावरान पान पंधरा दिवस टिकते. गावरान पान हे पूना, कळीचे, नागिणीचे आणि पूजेचे पान म्हणून प्रसिद्ध आहे.
- नीलेश खटाटे, विड्याच्या पानांचे विक्रेते