पुणे: पुण्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने निर्बंध कमी करण्यात आले. तर आजपासून सायंकाळी ७ पर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातूनही नागरिक मोठया संख्येने बाहेर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
एप्रिल, मे हे दोन महिने देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. पुणे शहरातही रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना दंडही आकाराला जात होता. जून महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होताना दिसू लागली. त्यानुसार राज्य सरकारनेही जिल्ह्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यांना निर्बंधात सूट देण्याचे ठरवले. पुणे महानगरपालिकेने हा रेट ५ टक्क्यांच्या आत आणून दाखवला. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. निर्बंधामुळे घरात अडकून बसलेले पुणेकर उत्साहाने बाहेर पडले आहेत.
अत्यावश्यक दुकाने व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या दुकानांना ७ पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तर हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना रात्री १० पर्यंतची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले मॉल आज उघडले आहेत. शहरातील जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, महात्मा गांधी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या प्रमुख रस्त्यांबरोबरच उपनगरातही सकाळपासून नागरिकांची वर्दळ दिसून आली. प्रमुख चौकात पोलिसही थांबले होते. नागरिक कामाबरोबरच मंडई, मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
पीएमपीएमल बस सेवेत वाढ
आज पासून निर्बंधात सूट दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासासाठी बस वाढवण्यात आल्या आहेत. आज ६५५ बसेस पुणे शहरात धावणार आहेत.
पोलिसांकडून गर्दी न करण्याचे आवाहन
नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. सार्वजनिक वाहतूकही चालू झाली आहे. बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. तरीही धोका अजून टळलेला नसून नागरिकांनी बेफिकीर राहू नये. तसेच नियमांचे पालन करून गर्दी करणे टाळावे. असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
कोरोना नियम मोडल्यास कारवाईचा इशारा
कोरोना अजूनही पूर्णपणे गेलला नाही. दुकानदार, नागरिक सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. नियम मोडल्यास महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जाईल. असे प्रशासनाने सांगितले आहे.