बाह्यरुग्ण विभागांमध्ये होतेय गर्दी : विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ
पुणे : अवेळी पडणारी थंडी, उकाडा आणि मध्येच पाऊस या हवामानात सातत्याने होणा-या बदलांचा परिणाम आबालवृध्दांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. विषाणूजन्य आजार डोके वर काढू लागल्याने दवाखान्यांमधील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सर्दी, पडसे, अंगदुखीने पुणेकर त्रस्त झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी थंडीची तीव्रता कमी झाली आणि हवेतील उकाडा वाढला. त्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पाऊसही पडला. हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, अंगदुखी अशा तक्रारी वाढल्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उबदार कपडे घालणे, संतुलित आहार घेणे, शारीरिक हालचाल करणे अशा साध्या-सोप्या उपायांचा अवलंब करावा, आजारपणाची कोणतीही लक्षणे दिसल्यास दुखणे अंगावर काढू नये, डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करुन घ्यावेत, असा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
-----------------------------
बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब अशा तब्येतीच्या तक्रारी काही प्रमाणात वाढल्या आहेत. श्वसनमार्गाचे आजारही वाढले आहेत. सध्याचे वातावरण विषाणूंना पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
-----------------
लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे आजारपण दिसून येत आहे. लक्षणांवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे औषधोपचार दिले जात आहेत. प्रतिजैविकांची गरज कमी प्रमाणात भासत आहे. अॅलर्जी, दम्याचा त्रास असलेल्या मुलांना छातीमध्ये घरघर होणे, कफ होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याप्रमाणे उपचार दिले जात आहेत. लक्षणांवर बारीक लक्ष ठेवून पालकांना फॉलोअप ठेवण्यास सांगितले जात आहे. अनेक दिवस मुले बाहेर पडली नसल्यामुळे मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या काळात मुलांना भूक न लागणे, वजन न वाढणे या तक्रारी दिसून आल्या नाहीत.
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ
------------------------
काय काळजी घ्यावी ?
* पालेभाज्या, फळे, कडधान्ये, फळभाज्या यांचा आहारात समावेश असावा.
* पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम यावर भर द्यावा.
* आजारपणाची कोणतीही लक्षणे दुर्लक्षित करु नयेत. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* स्वत:च्या मनाने अँटिबायोटिक औषधे घेऊ नयेत.
* थंडीत अथवा घराबाहेर पडताना उबदार कपडे घालावेत. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी