लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शहरातील आरोग्य व्यवस्था बिकट होत चालली असताना महापालिकेच्या १०० ऑक्सिजन व ४०० आयसोलेशन बेडचे साहित्य खराडीतील विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुलात धूळखात पडले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पुणेकर त्रस्त व महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी मस्त असे चित्र असल्याची टीका काँग्रेसने केली.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, हे क्रीडा संकुल भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मतदार संघात आहे. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असून सुध्दा त्यांच्या मतदार संघात अशा प्रकारचा भोंगळा कारभार होत आहे, ही शोकांतिका आहे. काँग्रेसने निवेदने दिली, पदाधिकारी, आयुक्तांची भेट घेतली, मात्र कोणीही यावर काहीही करायला तयार नाही.
त्या क्रीडा संकुलात भवन रचनेचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. आरोग्य खात्याने अशी माहिती बागवे यांनी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ हे फक्त आश्वासन देत आहेत. पण त्यांच्याकडून काम होत नाही. सभागृहनेते गणेश बिडकर सांगतात की, पुढच्या काही दिवसांत दळवी हॉस्पिटलच्या इमारतीतील जागेनुसार बेडही वाढविणे शक्य होईल. मात्र, तयार असलेल्या क्रीडा संकुलात रुग्णांना उपचार देण्यासाठी त्यांना कसलीही व्यवस्था करता येत नाही.
वास्तविक शहराचे खासदार गिरीष बापट, पुण्याचे रहिवासी असलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्याला पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, पण ते दिसायलाही तयार नाहीत. पुणेकरांना या स्थितीला आणण्यास भाजपाच जबाबदार आहे, असे बागवे म्हणाले.