Pravin Darekar: निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही, पुणेकर हा सजग मतदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:29 PM2021-09-30T14:29:00+5:302021-09-30T14:29:08+5:30
कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे पुणेकरांना माहित आहे
पुणे : राज्यात अवघ्या काही महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊ ठेपली आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच मंत्रिमंडळीही जिल्ह्यांना भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पक्षाबद्दलच्या विकासकामांची माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे. पुण्यातही गेल्या दोन महिन्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षाचे राजकीय नेते येऊ लागले आहेत. त्यावरच प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
दरेकर म्हणाले, ''पुण्यातील मतदार हा सजग मतदार आहे. मतदान करताना माणूस आणि विकासकाम पाहून तो मत देतो. त्यामुळं कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे त्यांना माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक राजकीय नेते आणि मंत्रीमंडळी निवडणुकीच्या तोंडावर दौरे करत आहेत. त्यानं काही होत नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.''
सध्या प्रभाग कितीचा असावा यासाठी महाविकास आघाडीत निर्णय होण्यास विलंब झाला. सुरुवातीला तीनचा आणि नंतर दोनचा प्रभाग करणार. आणि शेवटी तीनचा प्रभाग करण्यावर शिक्कमोर्तब करण्यात आला. त्यावर दरेकर यांनी सांगितले कि, आम्ही काम करत असताना एकचा दोनच प्रभाग म्हणून काम केलं नाही. तर आमच्या नगरसेवकांनी प्रभागाचा विचार न करता काम केलेली आहेत.
संजय राऊत राज्यभरात दौरे करून पक्षबांधणी करू लागले आहेत. शिवसैनिकांना त्यांच्या शहरात शिवसेनेचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देत आहेत. त्याबरोबरच विरोधकांवर जोरदार टिळकही केली जात आहे. तसेच नवाब मलिकही राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना केंद्राकडे बोट दाखवत आहेत. त्यावरच दरेकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.
''नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत. राऊत किंवा मलिकांनी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर काही भूमिका मांडली का ? असा सवाल उपस्थित करत त्यांना केवळ राजकीय बोलणं जमतं असा ते म्हणाले आहेत.''
केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा
''केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे. अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. केंद्र त्यांची जबाबदारी निभावेल, केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा आणि तात्काळ मदत करा. देवेंद्र फडणवीस यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. पूर भागाच्या पाहणीकरता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, ही माहितीही दरेकर यांनी दिली.''