पुणे : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने अांघाेळ, बाथरुम, पिण्याचे पाणी, कपडे, भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी असा सर्व विचार करुन एका व्यक्तीला दरराेज 155 लिटर पाण्याची अवश्यकता अाहे असा निर्णय दिला अाहे. या निर्णयानुसार माेजमाप केली असता दरराेज एका व्यक्तीला सहा बादल्यांमध्ये त्यांची दिनचर्या उरकावी लागणार अाहे. सहा बादल्या एका व्यक्तीसाठी पुरेशा असल्या तरी महापालिकेकडे माणसाप्रमाणे पाणी पुरविण्याची कुठलिही व्यवस्था नसल्याने पाणी वाटप कशा पद्धतीने करणार हा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे कमी संख्या असलेल्या कुटुंबाला अधिक पाणी तर माेठे कुटुंब असणाऱ्यांना कमी पाणी मिळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार अाहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेचा अधिक पाणी शहराला देण्याचा दावा फेटाळत दर माणशी 155 लिटर पाणी देण्यास मान्यता दिली अाहे. यानुसार वर्षाला 8.19 टीमसी पाणी महानगरपालिकेला मिळणार अाहे. सध्याची परिस्थीती पाहता शहराला 15 ते 16 टीमसी पाण्याची अावश्यकता अाहे. त्यामुळे येत्या काळात पुणेकरांचे पाणी अर्ध्यावर येणार अाहे. पाण्याचा काेटा वाढवून घेण्यासाठी राज्य सरकारकडे दाद मागणार असल्याचे अाश्वासन पुण्याचे अायुक्त साैरभ राव यांनी दिले अाहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के इतका पाणीसाठी धरणात कमी अाहे, त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे अावाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले अाहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरविलेल्या निकषानुसार एका व्यक्तीला दिवसाला किती बादल्या पाणी मिळेल याची लाेकमतने पाहणी केली.
या पाहणीनुसार एका व्यक्तीला दिवसाला साधारण 25 लिटरची क्षमता असलेल्या 6 बादल्या पाणी मिळणार अाहे. हे पाणी अंघाेळ, धुनी, भांडी, पिण्यासाठी वापरावे लागणार अाहे. पालिकेकडे दर व्यक्तीप्रमाणे त्या कुटुंबाला पाणी पुरवठा करण्याची कुठलिही व्यवस्था नसल्याने समान पाणीपुरवठा करणे कठीण जाणार अाहे. त्यामुळे छाेटे कुटुंब असलेल्या घराला प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणारे 155 लिटर पाणी पुरेल मात्र माेठे कुटुंब असलेल्या घरांना पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता अाहे. त्यामुळे येत्या काळात सध्याच्या तुलनेत 50 टक्के पाणीपुरवठा कमी हाेण्याची शक्यता अाहे.