पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला विनाकारण विरोध करून शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाहीत, हा आराखडा मंजूर व्हावा याकरिता जास्तीत जास्त पुणेकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.स्मार्ट सिटीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी कसबा मतदारसंघाच्या रविवारी २६ कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, विष्णू हरिहर, मनीषा घाटे, हेमंत रासने, धनंजय जाधव, राजेश येनपुरे, भगीरथ भुतडा, छगन बुलाखे, उदय लेले, संजय देशमुख, प्रमोद कोंढरे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.स्मार्ट सिटी प्रकल्प यशस्वी झाला, तर त्याचे भारतीय जनता पक्षालाच सारे श्रेय मिळेल, या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेकडून विरोध केला जात आहे. मात्र शहराच्या विकासाला होणारा विरोध पुणेकर सहन करणार नाहीत, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले मंडई येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून स्मार्ट सिटीच्या कोपरा सभांना सुरूवात झाली. त्यानंतर पालखी विठोबा चौक, एसपी चौक, फडके हौद चौक यासह २६ ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. शगुन चौकामध्ये याचा समारोप करण्यात आला. (प्रतिनिधी)
विकासाच्या आड येणाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाहीत
By admin | Published: December 14, 2015 12:35 AM