पुणे : सध्या मराठवाडा- विदर्भात पाण्याअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 1972 पेक्षा माेठा दुष्काळ असल्याचं बाेललं जात आहे. गुरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहे. गावाकडील वयाेवृद्ध नागरिकांना घाेटभर पाण्यासाठी उन्हात आठ- दहा किलाेमीटर पायपीट करावी लागत आहे. संपूर्ण दिवस हा पाणी भरण्यासाठी जात आहे. अशा दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना पुणेकर तरुण भावनिक साद घालत आहेत. पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संस्थेच्या तरुणांनी दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना एसटी मध्ये बसवून पुण्यात पाठविण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात त्यांची 2 जूनपर्यंत सर्व काळजी घेतली जाणार असून या उपक्रमातून काही काळ या आजी आजाेबांना दुष्काळाचा विसर पडावा अशी आशा या तरुणांना आहे.
अंघाेळीची गाेळी ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. दुष्काळी भागातील मुलांसाठी दरवर्षी या संस्थेकडून मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमातून दुष्काळाच्या झळा साेसणाऱ्या लहान मुलांना पुण्यात आणून त्यांना पुण्याची सफर घडविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यंदा देखील दुष्काळग्रस्त भागातील मुलांना पुण्याची सफर घडविण्यात आली. याच धर्तीवर आता दुष्काळात हाल साेसणाऱ्या वयाेवृद्ध नागरिकांसाठी पाण्याच्या गावाला जाऊया हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत दुष्काळात हाल हाेणाऱ्या 50 आजी आजाेबांना पुण्यात आळंदी येथे आणण्यात येणार आहे. तेथे त्यांची राहण्याची तसेच जेवणाची साेय करण्यात येणार आहे. त्याचबराेबर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन त्यांच्या सानिध्यात भक्ती करत काही काळ घालवता येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अंघाेळीची गाेळी या संस्थेचे माधव पाटील म्हणाले, मराठवाडा- विदर्भात यंदा माेठा दुष्काळ पाहायला मिळताेय. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहेत. त्यातच वयाेवृद्ध नागरिकांचे यात हाल हाेत आहे. त्यामुळे त्यांना काहीकाळ दिलासा देण्यासाठी आम्ही पाण्याच्या गावाला जाऊया हा उपक्रम हाती घेत आहाेत. या उपक्रमांतर्गत दुष्काळाच्या झळा साेसणाऱ्या 50 आजी- आजाेबांना आम्ही पुण्यात निवारा आणि अन्नछत्राची व्यवस्था करणार आहाेत. या आजी आजाेबांचे आम्ही काही काळासाठी मुलं हाेणार आहाेत. आजी- आजाेबांना पुण्याच्या एसटीत बसवावे पुढची जबाबदारी आम्ही घेऊ असे आवाहन आम्ही करत आहाेत. आळंदीमधील धर्मशाळेमध्ये आम्ही आजी- आजाेबांची साेय करणार आहाेत.