पुणे : महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे. घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने एकूण करदात्यांपैकी ४५.८७ टक्के करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. नेट बँकींगद्वारे १ लाख ४६ हजार २२० नागरिकांनी कर भरला आहे. तर क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ९२ हजार ९५१ आणि डेबीट कार्डच्या माध्यमातून ८३ हजार ९२७ करदात्यांनी कर जमा केला आहे. पालिकेचे उत्पन्न वाढावे, थकित मिळकतकर भरला जावा, तसेच हा कर वेळेत भरला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढावा याकरिता करामध्ये सवलत देण्यासोबतच दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन कर स्विकारण्यासाठी भारत क्युआर कार्ड, कॅश कार्ड, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट, एनईएफटी आरटीजीएस, नेट बँकींग, पोस्ट क्रेडीट कार्ड, पोस्ट डेबीट कार्ड, युपीआय, गुगल पे, फोन पे आदी प्रणालींचा अवलंब केला आहे. आजमितीस जमा झालेल्या १ हजार ९५ कोटी मिळकतकरापैकी ३८१ कोटी ५८ लाख ६० हजार ३८६ रुपये ऑनलाईन पद्धतीने पालिकेकडे जमा झाले आहेत. तर मिळकतकर भरलेल्या एकूण करदात्यांपैकी ४५.८७ टक्के करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. ज्यांनी मिळकत कराची थकबाकी ठेवलेली आहे अशा तब्बल ७०० मिळकती सील करण्यात आल्या आहेत. थकबाकी दारांच्या घरांसमोर बँड वाजविणे, नोटीसा देणे, नावाची जाहिर करणे, मिळकती सील करणे, मिळकतीचा लिलाव करणे अशी कारवाई सुरु आहे. येत्या १५ दिवसात १०० ते १५० कोटींचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा होईल अशी आशा कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 7:13 PM
महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे.
ठळक मुद्देक्रेडीट कार्ड ९२ हजार ९५१ आणि डेबीट कार्डच्या माध्यमातून ८३ हजार ९२७ कर जमापालिकेचे उत्पन्न वाढावे, कर वेळेत भरला जावा यासाठी प्रयत्न सुरु ज्यांनी मिळकत कराची थकबाकी ठेवलेली आहे अशा तब्बल ७०० मिळकती सील