डमी 860
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आकर्षक व व्हीआयपी क्रमांकाचे वेड पुणेकरांना पहिल्यापासूनच आहे. त्यासाठी कितीही रुपये मोजण्याची तयारी असते. पुणेकराना ९९९९ क्रमांक हा सर्वांत जास्त आवडणारा आहे. चारचाकीसाठी ह्या क्रमांकाची फी दीडलाख रुपये आहे. मात्र, लिलावात हा क्रमांक तीन लाख रुपयांना देखील घेतला जातो. यावरून पुणेकरांना हा नंबर किती आवडतो ते दिसून येतो.
पूर्वी व्हीआयपी अथवा फॅन्सी क्रमांक आरटीओ आपल्या वजनावर दिले जात असत. आकर्षक क्रमांकासाठी वशिला चालत असे. तेव्हा परिवहन विभागाने आकर्षक क्रमांकाची यादी करून त्यासाठी फी आकारणे सुरू केले. त्यातून आरटीओ विभागाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न सुरू झाले.
--------------------------
या तीन क्रमांकाला सर्वाधिक मागणी
पुणेकरांची सर्वाधिक मागणी ही ९ क्रमांकाला आहे. यात ९९९९, ९९९, ९०९, ९००९ आदी क्रमांकाची सर्वाधिक मागणी होते. या शिवाय १२ ,१२१२ ,१८ व २७ या क्रमांकाला देखील चांगली मागणी आहे.
-----------------------याचा रेट सर्वांत जास्त :
क्रमांक १ याची फी सर्वांत जास्त आहे. चारचाकी वाहनासाठी ४ लाख रुपये, तर दुचाकीसाठी पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. तसेच ७८६, ०००९, या क्रमांकास अनुक्रमे दीडलाख, वीस हजार रुपये असे शुल्क आहे.
----------------------
तर होतो लिलाव :
दुचाकी अथवा चारचाकी क्रमांकासाठी नवी मालिका सुरू होत असताना, ज्या वाहनधारकांना त्या मालिकेतला फॅन्सी क्रमांक हवा आहे, तो त्या क्रमांकाच्या शुल्काची रक्कम डीडीने आरटीओ कार्यालयात जमा करतो. एकाच क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज आले, तर त्या अर्जधारकांना लिलाव पध्दतीला सामोरे जावे लागते. जो सर्वाधिक रक्कम देईल, त्यांना तो क्रमांक दिला जातो.
-------------------
अनेकांना आपल्या पसंतीचा क्रमांक हवा असतो. कुणाला अंकशास्त्रानुसार हवा असतो, तर कुणाला दिसायला प्रभावी वाटेल, असा क्रमांक हवा असतो. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास नागरिक तयार असतात.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.