पुणे : मध्यवर्ती भागातून शहराच्या इतर भागात स्थलांतरित झालेल्या मूळच्या पेठांमधील नागरिकांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त हाेती.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील असंख्य नागरिक सिंहगड रस्ता, काेथरूड, वाकड, बाणेर बावधान या भागात स्थलांतरित झाले आहेत. रविवारी मतदान करण्यासाठी सदाशिव पेठेतील विविध मतदान केंद्रावर हजर झाले हाेते. सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप हायस्कूल, भावे शाळा, पुणे विद्यार्थी गृह, एसपी काॅलेज, न्यू इंग्लिश स्कूल तसेच शुक्रवार पेठेतील जेधे महाविद्यालय आणि शिवाजी मराठा हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान पार पडले.
मतदानासाठी आले माहेरी
सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या शाळेजवळच माझे माहेरचे घर आहे. लग्नानंतर मी सध्या माझ्या कुटुंबासह आंबेगाव पठार भागात राहायला आहे; मात्र कसबा मतदारसंघात माझे नाव कायम ठेवले आहे. मतदान हे मी माझे कर्तव्य मानते आणि मी नियमितपणे मतदान करण्यासाठी येते अशी माहिती कल्याणी हरिभाऊ तनपुरे - परदेशी यांनी दिली.
आयटीयन्सनेही बजावला हक्क
शुक्रवार पेठेतील जेधे काॅलेज केंद्रावर आलेले सायली आणि प्रथमेश जटार म्हणाले, आम्ही सुभाषनगरमध्ये राहायला असून दाेघेही आयटी कंपनीत नाेकरी करताे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी मतदान केले पाहिजे. याेग्य उमेदवार निवडून दिला तर परिसराच्या विकासाला चालना मिळते, स्थानिक प्रश्न सुटतात असे सांगत मुलगा कियान यालाही आम्ही साेबत आणले असून मतदान कसे केले जाते? याची माहिती दिल्याचे ते म्हणाले तसेच सुशिक्षितांनी राजकारणाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला असल्याचे आयटी अभियंते मयूर आणि त्यांची पत्नी निकिता तावरे यांनी सांगितले.
पहिल्या मतदानाची मनात उत्सुकता
मतदानाबद्दल मनात खूप उत्सुकता हाेती. आज पहिल्यांदा मतदान केले. चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत मतदान केले पाहिजे. - सृष्टी ठिगळे (वय २३, शुक्रवार पेठ )