पुणे : अमेरिकेतील फायझर कंपनीची कोरोनावरील लस पुण्यात कधी उपलब्ध होणार असा प्रश्न एका पुणेकराने थेट फायझर कंपनीच्या अध्यक्षांनाच विचारला. त्यावर त्यांनी देखील चोवीस तासांच्या आत त्यांना उत्तर पाठवले.
एका पुणेकराच्या पत्राला फायझरने तातडीने उत्तर का द्यावे? याचे कारण की या पुणेकराकडे फायझर कंपनीचे समभाग (शेयर्स) आहेत. आपल्या ‘शेयरहोल्डर’च्या शंकेचे समाधन करण्याची तत्परता अमेरिकी कंपनीने दाखवली. फायझरच्या ‘शेयरहोल्डर’ पुणेकराचे नाव आहे प्रकाश मिरपुरी.
मिरपुरी यांना ‘फायझर’चे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बऊर्ला यांची ईमेल आली. यात ते लिहितात - “भारतात तुम्हाला फायझरची लस लवकरात लवकर मिळावी असे आम्हाला वाटते. पण अद्याप आम्हाला त्यासाठीची नियामक मान्यता मिळालेली नाही. ती मिळविण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. सरकारच्या लसीकरण कार्यक्रमात आमची लस उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारसोबत करार करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. वेळेची गरज आम्ही ओळखून आहोत आणि जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी भारतात त्वरित लस उपलब्ध होण्याची गरज आम्ही जाणतो.” देशांतर्गत लसीचे वितरण हा मात्र सरकारचा निर्णय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिरपुरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “कोरोनाबाधित झाल्याने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यानंतर मी फायझर, मॉडर्नाचे (कोरोना लस उत्पादक अमेरिकी कंपन्या) शेअर विकत घेतले. माझा कुटुंबाला सर्वोत्तम लस मिळावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे ती नेमकी कधी उपलब्ध होणार, हे जाणून घेण्यासाठी मी थेट सीईओंशी संपर्क साधला. त्यांनी २४ तासांच्या आत मला उत्तर पाठवले. जर एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा सीईओ एका भागधारकाला २४ तासांमध्ये उत्तर पाठवत असेल तर सरकारकडूनही यााबाबत वेगाने कार्यवाही व्हायला हवी. सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत असे मला वाटते.”
रशिया आणि अमेरिकेतील परदेशी लसी जुलै महिन्यात देशात येतील, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. यातही अमेरिकेच्या फायझरबद्दल लोकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. फायझरची परिणामकारकता जास्त असल्याचे सांगितले जात असल्याने अनेकजण ही लस येण्याची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रकाश मिरपुरी यांनी थेट फायझरच्या अध्यक्षांकडून आलेली ईमेल महत्त्वाची मानली जात आहे.