पुणे शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी, सांस्कृतिक राजधानी आणि क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. आता पुण्याचा देशातील ‘स्मार्ट सिटी’च्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये सहभाग होणार आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्याच्या दर्जेदार सुविधा नागरिकांना पुरवाव्या लागणार आहेत. नागरिकांनी स्मार्ट सिटीसाठी दिलेल्या सूचनांमध्ये सर्वाधिक प्राधान्य वाहतूक प्रकल्पाला (३५ टक्के ) देण्यात आले आहे. त्यानंतर कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य व पर्यावरणाला नागरिकांनी महत्त्व दिलेले आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. शहराच्या चारही दिशांना भुयारी मार्ग व उड्डाणपूल उभारले जात आहेत. मेट्रो प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.राष्ट्रीय मानकांनुसार शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या १६ टक्के रस्ते आवश्यक आहेत. प्रत्यक्षात पुणे शहरातील रस्त्याखालील क्षेत्र ७ टक्के आहे. जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यात रस्तेरुंदीकरणाला सर्वाधिक विरोध आहे. तब्बल ७० ते ८० टक्के हरकती रस्तारुंदीकरणाला विरोध करणाऱ्या आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग, उड्डाणपूल, मेट्रो, मोनोरेल व अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया महत्त्वाची असून, नागरिकांचा लोकसहभाग व सहकार्य आवश्यक आहे.
पुणेकरांनी घ्यावा पुढाकार!
By admin | Published: August 05, 2015 3:06 AM