पुणे: गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, पुण्यामध्ये देखील यंदाचा उन्हाळा असाह्य होऊ लागला आहे. यामुळेच महापालिकेने शहरातील सर्व उद्याने रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याने विभागाने काढलेल्या अध्यादेशात १५ जूनपर्यंत सर्व उद्याने रात्री ९ पर्यंत खुली राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे शहराची ओळख उद्यानांचे शहर म्हणून आजही कायम आहे. शहरामध्ये सध्या तब्बल २०० लहान-मोठी उद्याने आहेत. यामध्ये शहरातील काही उद्यांनामध्ये वर्षभर नेहमीच गर्दी असते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वर्गीय पु. ल. देशपांडे उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारसबाग, कमला नेहरू उद्यान, हडपसर येथील लोहिया उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशा प्रमुख आणि मोठ्या उद्यानांचा समावेश आहे. या उद्यांनामध्ये उन्हाळ््याच्या सुट्टीत रात्री उशीरापर्यंत प्रचंड गर्दी होते. या उद्यानांसाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या उद्यानात पर्यंटक तसेच बालचमूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी आता सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे.
पुणेकरांचा उन्हाळा होणार सुखकर : शहरातील उद्याने रात्री ९ पर्यंत राहणार खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 8:22 PM