पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून पुणेकरांना त्यांच्या वाहनाचे आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेले नाही. याचे प्रमुख कारण स्मार्ट कार्डचा तुटवडा हे होते. पण, येत्या १ जुलै पासून पुणेकरांची ही प्रतिक्षा थांबणार असून, दिवसाला ४५ हजार स्मार्ट कार्ड (लायसन्स आणि आरसी) तयार केले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
१ जुलै पासून वाटप होणारे स्मार्ट कार्ड हे जून्या स्मार्ट कार्डपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे आणि आधीपेक्षा कमी किंमतीत नागरिकांना मिळणार आहे. स्मार्ट कार्डच्या पुरवठ्याबाबत हैदराबाद येथील रोझमार्टा या कंपनीशी राज्याच्या परिवहन विभागाचा असलेला करार संपुष्टात आला आहे. आता कर्नाटक येथील मणिपाल टेक्नॉलॉजी कंपनीला स्मार्ट कार्डचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार रोज किमान ४५ हजार स्मार्ट कार्ड परिवहन विभागाला मिळतील. तसेच यंदा पहिल्यांदाच परिवहन विभागाने स्मार्ट कार्डवर वाहनधारकांचे नाव, पत्ता प्रिंट करण्याचे अधिकार स्थानिक आरटीओ कार्यालयांकडून काढून घेतले आहेत. आता हे अधिकार राज्यातील केवळ तीनच आरटीओ कार्यालयाला असतील. यात पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. सध्या वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी ९४ रुपये तर आरसी काढण्यासाठी ५६ रुपये एवढा दर आकारला जात होता. आता नवीन स्मार्ट कार्डमुळे वाहन चालवण्याचा परवाना ३० रुपयांनी तर आरसी ८ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
नव्या स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये..
- वाहनधारकाचे नाव आणि फोटो उत्कृष्ठ दर्जाने छापला जाणार- पहिल्यांदाच लेझर इंन्ग्रेव्हिंग तंत्राचा वापर- स्मार्ट कार्डमध्ये चिपचा वापर आता केला जाणार नाही