'स्वाभिमान' दुखावलेल्या पुणेकराचे अजितदादांना पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:37 PM2020-07-19T13:37:14+5:302020-07-19T13:38:32+5:30

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायांबाबत मुंबईच्या आयुक्तांनी खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली.

Punekar's written letter to Ajit Pawar! | 'स्वाभिमान' दुखावलेल्या पुणेकराचे अजितदादांना पत्र!

'स्वाभिमान' दुखावलेल्या पुणेकराचे अजितदादांना पत्र!

googlenewsNext

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यामुळे मुंबईच्या महापालिका आयुक्तांना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पुण्यात पाचारण केले. पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायांबाबत मुंबईच्या आयुक्तांनी खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली. पुणे-मुंबईमधील परंपरागत असुयाजन्य स्पर्धा जगविख्यात आहे. असं असताना मुंबईच्या माणसाने पुण्यात येऊन ‘असं वागा...तसं वागा...’असा शहाणपणा शिकवणे आधीच लॉकडाऊनग्रस्त जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना हे रुचलेले नाही. त्यांनी हा (नेहमीप्रमाणेच) प्रश्न तत्त्वाचा करून पालकमंत्र्यांना अनावृत्त पत्राद्वारे ‘मुद्देसूद’ जाब विचारला. ते मुद्देसूद पत्र असे. 

राजमान्य राजश्री सन्माननीय पालकमंत्री 
महोदय ऊर्फ ति. दादांस,
स. न. वि. वि. 

१. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे समस्त पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे; परंतु मधल्या काळात पुण्यात ‘बाहेरच्यां’ची प्रचंड भर पडल्यानं येथील जन्मजात ‘सोशल डिस्टन्सिंग’ ढासळलं. खरं तर अंतर राखून न वागणाºया बाटग्या पुणेकरांमुळे हे कोरोना संकट उद्भवले. त्यामुळेच पाहुण्या कोरोनाचा मुक्काम लांबलाय. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची पर्वा न करता शारीरिक लगट करत अघळपघळ वागणाºया त्या ‘बाहेरच्या पुणेकरां’चे ट्रेसिंग करून त्यांना विलगीकरण कक्षात टाका. 
२. घरात आलेल्या पाहुण्याला तो निघाल्यावरच चहाचा तोंडदेखला आग्रह करून त्याची पाठवणी करणाऱ्या अस्सल पुणेकराप्रमाणे न वागता, घरात बसवून आग्रहाने त्याला खान-पान सेवा पुरवत पाहुणचार करणाºया बाहेरच्या शहरातल्या पुणेकरांना शोधून काढा. त्यासाठी अस्सल पुणेकर पडताळणी चाचणी (रिअल पुणेकर व्हेरिफिकेशन टेस्ट) करा. सदाशिव-नारायण आणि शनिवार पेठेतील अर्क पुणेकर निवडा. हे पुणेकर निवडण्यासाठीच्या समितीत अर्थातच ‘मिसळवाल्या जोशीं’चा समावेश करा.
३. तुम्ही काही वर्षांपूर्वी आम्हा पुणेकरांच्या जास्त पाणीवापराचा उद्धार केला होता. त्यानंतर तुमच्या पक्षाला पुण्याचं खरं पाणी दाखवून आम्ही तुमच्या तोंडचं पाणी पळवलं होतं, हे विसरलांत काय? आता पुन्हा मुंबईच्या माणसाला पुणेकरांची ‘शाळा’ घ्यायला लावून तुम्ही पुणेकरांच्या अस्मितेचा चोळामोळा केला. 
४. पुणेकर वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार ‘लॉकडाऊन’ करतच आलेत. ग्राहकांचा किमान शब्दांत कमाल अपमान करण्यासाठी अस्सल पुणेरी दुकानदार प्रसिद्ध आहेत. मात्र, परप्रांतीय पुणेकरांनी (म्हणजे अस्सल पुणेरी सोडून सर्व) ग्राहकांचे चोचले पुरवले. शहराचं पारंपरिक ‘लॉकडाऊन’ पाळलं नाही दुकानं सदैव उघडी ठेवून लांगूलचालन केलं. या शहराच्या आरोग्याला ते मानवणारं नव्हतंच त्यामुळे कडक लॉकडाऊन भोगण्याची पाळी पुण्यावर आली. हे मूळ कारण तुम्ही लक्षांत घ्या.
५. मुंबईत धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोना आटोक्यात येऊ शकतो, तर पुण्यात का नाही? असा प्रश्न तुम्ही विचारलाय. अहो काही दिवसांपर्यंत पुण्यातील मोठी जनता वसाहतही दीर्घकाळ कोरोनामुक्तच होती. त्याचं कौतुकही सर्वदूर झालं. त्याचाच आदर्श मुंबईकरांनी घेतलाय. येथेही पुणेकरांचंच पहिलं पाऊल आहे. 
६.आमच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तुम्ही ‘दादा’गिरी करताहात, असा आरोप आहे. ‘पानिपता’त विश्वासराव गेल्यानंतर, पुणेकरांचा कुणावरही सहजी विश्वास बसत नाही, तरी पालकमंत्री या नात्यानं तुम्ही आमच्या नेत्यांना मोठ्या खुबीनं विश्वासात घ्यायलाच हवं. 
७. आपण धडाकेबाज आहात. मान्य. परंतु पुणेकरांना समजून घेताना थोरल्या ‘बारामतीकरां’ची मती आजवर अनेकदा गुंग झाली आहे. राजकारणातील ‘पुणे पॅटर्न’चे जन्मदाते असणारे आपण या कोरोनाला हटवण्याचा नवा ‘पुणे पॅटर्न’ शोधा. पुणेकर नक्की सहकार्य करतील.
    असो! बाकी आपल्यासारख्या सुज्ञांस सागणे न लगे. 
                                                                                                                                             

                                                                                                                                              आपला विश्वासू (बापटांची क्षमा मागून)
                                                                                                                                                   - अभय नरहर जोशी

ता. क. ‘रिअल पुणेकर व्हेरिफिकेशन टेस्ट’ घ्यायचं तेवढं विसरू नका.

                                                                                             

Web Title: Punekar's written letter to Ajit Pawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.