उमेदवार होनराव
- पूर्वी पुण्यात होनराव म्हणून एकजण होते. त्यांना निवडणूक लढवण्याची भारी हौस. कोणतीही निवडणूक असो. त्यात होनराव असणारच. त्यांच्या घरचेच त्यांना इतके वैतागले होते की त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच ‘यांना निवडणूक लढवायला मनाई करा’ असा अर्ज केला असल्याची चर्चा होती. त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला असावा असेही बोललं जायचं. एकदा ते महापालिकेसाठी उभे होते. काही टुकार मुलांनी त्यांना पकडलं. त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. बोर्ड तयार केले. त्यांचा वॉर्ड शुक्रवार पेठ व त्यांना मिरवणुकीने आणलं फर्ग्युसन रस्त्यावर. तिथे त्यांना भाषणासाठी विषय दिला व्हिएतनाम युद्ध, तेही या सगळ्याची छान मजा घेत होते. मुले म्हणतील ते ऐकत होते. घोडा आला, बँड आला, बोर्ड तर लावलेलेच होते. शेवटी हे थांबलं व कंटाळलेली मुले निघून गेली. घोडेवाला, बँडवाले, बोर्डवाले होनरावांभोवती जमा झाले. त्यावेळी मी होनरावांचे शहाणपण बघितले. त्यांच्याकडे पैसे मागितले की ते म्हणत, तुम्हाला मी बोलावले? मी यायला सांगितले? आधी काही ठरले? ठरवले होते? मग पैसे कसले मागता? वैतागून बँडवाले, घोडेवाला बिचारे निघून गेले व होनराव पुन्हा प्रचारासाठी सिद्ध झाले.
आदिवासी आणि आदिनाथ
- आमच्या आदिनाथ सोसायटीने एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं. त्याचे उद्घाटन करायचे होतं. दोन चांगल्या राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती बोलावल्या होत्या. मोठा कार्यक्रम होता. आदिनाथ सोसायटी त्यावेळची सर्वात मोठी सोसायटी. कार्यक्रमाला चांगली गर्दी होती. एक पाहुणे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आले. आल्यानंतर त्यांनी भाषण सुरू केलं ते थेट आदिवासी समाजासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती देणारं. हा समाज कसा सर्वाधिक जुना आहे, त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सरकारने कशी घेतली आहे असं बरंच काही ते सांगू लागले. बरं, त्यांना अडवणार कोण? त्यांचं पद वगैरे सगळंच मोठं. सुरुवातीला वाटलं सांगत असतील काही, पण अशा आदिवासी समाजाने इतकं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं हा एक प्रकारचा चमत्कारच आहे, असे त्यांनी म्हटल्यावर मात्र आम्हाला काय झाले तेच कळेना. मी सहज म्हणून बाहेर येऊन कमानीवर अडकवलेला बॅनर पाहिला तर वाऱ्याने तो अडकल्यामुळे आदि एवढा एकच शब्द दिसत होता. नाथ दिसतच नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:च आदिवासी समाजाचे काहीतरी असेल असे ठरवून भाषण ठोकले हे लक्षात आले.
-गप्पाजीराव