पुणे : पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पुणेरी टाेल्यासाठी या पाट्या प्रसिद्ध आहेत. अशीच एक पाटी सध्या साेशल मिडीयावर व्हायरल हाेत असून या पाटीतून अत्यंत मार्मिकपणे टिप्पणी केली आहे.
पुण्यातील शनीपार ते मंडईच्या रस्तावरील एका घराच्या दाराला ही पाटी लावण्यात आली आहे. येथे 90 वर्षांचे वृद्ध पुणेकर राहतात, वेळ कधी सांगून येत नाही, तरी कृपया सुज्ञ पुणेकरांनी दरवाजासमाेर वाहने लावू नयेत असे या पाटीवर लिहीण्यात आले आहे. सध्या ही पाटी पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाली आहे. ही पाटी साेशल मिडीयावर देखील माेठ्याप्रमाणावर व्हायरल झाली असून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया यावर उमटत आहेत. सध्या पुण्यात पार्किंकचा प्रश्न गंभीर झाला असल्याने त्यावर मार्मिक भाषेत भाष्य करण्यात आले आहे.
पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस माेठ्याप्रमाणावर वाढत आहे. दरराेज 700 ते 800 नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. अशातच पार्किंगची माेठी समस्या निर्माण झाली आहे. खासकरुन पेठांमध्ये पार्किंग मिळणे अवघड झाले आहे. सुटीच्या दिवशी नागरिक माेठ्याप्रमाणावर शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीला येत असल्याने वाहनांची संख्या वाढते. त्यातच नागरिकांकडून अनेकदा येथील घरांच्या दारासमाेरच वाहने लावण्यात येत असल्याने येथील रहिवाश्यांना बाहेर पडणे मुश्किल हाेते. या पाटीतून दारासमाेर वाहने न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.