#puneribappa : पाणीपुरीपासून साकारला बाप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 06:32 PM2018-09-20T18:32:35+5:302018-09-20T18:33:35+5:30
पाणीपुरीतून गणेशाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न पुण्यातील गुडमेवार कुटुंबीयांनी साकारली आहे.
पुणे : देव चराचरात आहे असं म्हणतात. त्याला माणसात, प्राण्यांमध्ये बघता येते असंही सांगितलं जात. पण मग देवाचे रूप साकारताना विशिष्ट वस्तूंचा अट्टाहास कशासाठी असाही प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधत पाणीपुरीतून गणेशाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न पुण्यातील गुडमेवार कुटुंबीयांनी साकारली आहे.
पुण्यातील गणेश भेळ सेंटर येथे पाणीपुऱ्यांचा वापर करून गणपतीचे रूप साकारले आहे. सुमारे दहा हजार पुऱ्यांपासून आणि शंभरपेक्षा अधिक कागदी द्रोण वापरून ही मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती बनवायला दहा दिवस आणि चार रात्रींचा कालावधी लागला.ही मूर्ती सध्या आजूबाजूच्या लोकांच्या औत्सुक्याचा विषय बनली असून सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसत आहे. गम्मत म्हणजे इथे प्रसादही पाणीपुरीचा वाटला जात असून त्यासाठीही मोठी गर्दी होताना दिसत आहे.
याबाबत रुपेश गुडमेवार यांनी लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले की, यंदा थर्माकोलवर बंदी आहे. त्यामुळे पर्यावरण जपले जावे याचा आमचा प्रयत्न होता. मग इतर काहीतरी वापरून मूर्ती बनवण्यापेक्षा आपला जो व्यवसाय आहे तीच पाणीपुरी का वापरू नये असा विचार समोर आला आणि ही मूर्ती साकार झाली. सध्या या मूर्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लहान-मोठे येऊन सेल्फी घेत आहेत.