पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे. १३ वर्षांच्या विद्यासागरने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यासागर हा पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या (आयएयू) शताब्दी वर्षांनिमित्त ग्रह-ताऱ्यांना नाव देण्याची स्पर्धा जागतिक पातळीवर घेण्यात आली. त्याच स्पर्धेतला एक भाग म्हणून ग्रह-ताऱ्यांना भारतीय भाषांतील नाव सुचवण्यासाठी ‘नेम एक्झोवर्ल्ड्स इंडिया’ स्पर्धा जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, विज्ञानाची गोडी लागावी हा या स्पर्धेचा हेतू होता. या स्पर्धेत संपूर्ण देशातून १ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ समितीकडून परीक्षण करून अंतिम फेरीसाठी १० नावे निवडण्यात आली. अंतिम फेरीत विजेता निवडण्यासाठी खुले मतदान घेण्यात आले. जवळपास ५ हजार ५८७ नागरिकांनी केलेल्या मतदानानंतर दोन नावे निश्चित करण्यात आली.त्यात विद्यासागरने सुचवलेले 'संतमस' आणि अनन्यो भट्टाचार्यने 'बिभा' ही दोन नावे निवडण्यात आली आहेत. यापैकी एचडी८६०८१ या ताऱ्याला ‘बिभा’ आणि एचडी८६०८१ या ग्रहाला ‘संतमस’ ही नावे देण्यात आली आहेत.
याबाबत अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ जी. सी. अनुपमा यांनी माहिती दिली की, अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्यामाध्यमातून भारतीय भाषांमध्ये सुचवण्यात आली.ही नावे आंतरराष्ट्रीय खगोल महासंघांने स्वीकारली आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांचा आणि अंतिम फेरीतील स्पर्धकांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.