पुणे : पुण्यात नाईट नव्हे तर आफ्टरनून लाईफ सुरु करावी लागेल अशी कोपरखळी मारलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना अखेर आपल्या वक्तव्याची सारवासारव करावी लागली आहे. पुणेकर माझे वक्तव्य विनोदाने घेतील आणि त्याबाबत तेही विनोद करतात अशा शब्दात ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
मुंबईत नाईटलाईफ सुरु केल्यावर ठाकरे यांना पुण्यातही नाईटलाईफ सुरु करणार का असा सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरु करावी लागेल असा टोमणा मारला होता. त्यावर पुणेकरांच्याकडून सोशल मीडियावर ठाकरे यांचा समाचारही घेण्यात आला होता.
ठाकरे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'प्लास्टिक वापर बंदीबाबत पुणे चांगली भूमिका बजावत आहे, इकोफ्रेंडली वातावरणासाठी पुणे चांगली दिशा दाखवू शकते. पुण्यात ज्या प्रकारे कापडी पिशव्यांचा बांबूच्या वस्तूंचा वापर केला जातो, त्या गोष्टी राज्यात किंबहुना देशातही सगळीकडे व्हायला हव्यात.पुण्याला कार्बन मुक्त करण्यासाठी 2030 टार्गेट आहे,मात्र पुणे 2025 मध्ये ते पूर्ण करेल असा मला विश्वास आहे.आघाडीचं सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक आहे. जगातील बेस्ट प्रॅक्टिस राज्यात आणणार असंही सांगायला ते विसरले नाहीत.