पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत पसरली आहे. या कोयत्याचे लोण आता थेट शाळांमध्ये पोहोचले आहे. दोन अल्पवयीन मुलांनी मंगळवारी दुपारी अप्पा बळवंत चौक येथे एका विद्यार्थ्यावर वार केला. यात नूतन मराठी विद्यालयात अकरावीमध्ये शिकणारा १७ वर्षीय विद्यार्थी जखमी झाला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. विशेष म्हणजे पुणेपोलिसांनी साेमवारी (दि. ३० जानेवारी) याच कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन केले होते. आराेपींपैकी एकजण शिकत असून पद्मावती परिसरात राहतो. दुसरा तुळशीबागेत काम करतो.
मैत्रिणीशी बाेलल्याच्या रागातून कृत्य
जखमी युवक एकाच्या मैत्रिणीसोबत बसस्टॉपवर बोलत होता. त्याचा राग आला आणि त्याने मित्राच्या मदतीने चक्क कोयत्यानेच वार केला. या हल्ल्यात शेजारी असलेला विद्यार्थीदेखील जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी युवकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.