पुणे : लडाखला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त व्हावा, या मागणीसाठी पर्यावरणवादी सोनम वांगचूक लडाखमध्ये २१ दिवसांचे उपोषण करत आहेत. गोठवणाऱ्या थंडीतही लडाखच्या विविध प्रश्नांसाठी सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू आहे. नाजूक इकोसिस्टिमला जपण्यासाठी लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणेकरांनी रविवारी चार-पाच ठिकाणी एक दिवसाचा क्लायमेट फास्ट केला.
संपूर्ण देशातील पर्यावरणप्रेमींना एका दिवसाचं उपोषण करण्याचं आवाहन वांगचूक यांनी केले होते. त्यानुसार पुण्यात हे आंदोलन झाले. त्यांच्या आवाहनाशी एकजूट दर्शवित पुणे शहरवासी एक दिवसासाठी क्लायमेट फास्ट पाळला. त्यासाठी पाच-सहा ठिकाणी नियोजन केले होते. या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाची नितांत आवश्यकता याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि वांगचूक यांच्या चळवळीला पाठिंबा देणे हा आहे. शहरातील संभाजी पार्क, कलाकार कट्टा, अभिनव कॉलेज, पाषाण कर्वे पुतळा, आंबेडकर चौक, पिंपरी या ठिकाणी हे एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संतोष ललवाणी यांनी दिली.
टिकाऊ पद्धती आणि पर्यावरणाची जबाबदारी यांची किती गरज आहे, हे सोनम वांगचूक त्यांच्या आंदोलनांमधून अधोरेखित केले जात आहे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या नाजूक परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी सामूहिक कृती करणे किती महत्त्वाचे आहे, हे या शांततेत्मक क्लायमेट फास्टद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.
- श्वेता कुलकर्णी, लडाख फ्रेंड्स पुणे