पुणे : वेळेत आणि पुरेसे पाणी येत नसल्याने वैतागलेल्या नगरसेवकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात चहापाणी आंदोलन केले. साहेब चहा-पाणी घ्या, पण पाणी द्या असे फलक हातात घेत केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात रंगली आहे.
पुणे शहरातील खराडी-चंदननगर, वडगावशेरीमधील पाणीपुरवठा अनेक वर्षांपासून विस्कळीत आहे.या भागातील नागरिक या बाबतीत नेहमी नाराजी व्यक्त करत असतात.या भागासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड धरणाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे.या प्रकाराला कंटाळून अखेर स्थानिक नगरसेवक ऍड भैय्यासाहेब जाधव यांनी बुधवारी आंदोलन केले.त्यात त्यांनी नागरिकांसह महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत पाण्यासाठी गांधीगिरी आंदोलन केले.येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी घोलप यांना यावेळी निवेदन देण्यात आले. हा प्रश्न येत्या चार दिवसात सोडवण्यात आला नाही तर यापुढे तीव्र मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.याबाबत जाधव म्हणाले की, वारंवार तक्रार करत असून सुद्धा महापालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे डोळेझाक करतात.विस्कळीत व अनियमित पाणीपुरवठा प्रश्नाला नागरिकच नव्हे तर लोकप्रतिनिधीही त्रासले आहेत. आता तरी महापालिका अधिकारी व कर्मचारी प्रतिसाद देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.या चहापाणी आंदोलनात आजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमन पठारे, संजिला पठारे सहभागी झाले होते.