पुणे : पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर हे बेपत्ता होऊन तब्बल १८ दिवसांनंतर आता एक आशेचा किरण दिसून आला आहे़ पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसून आले आहे़ त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे़ त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ६ पथके केली असून कोकणातही त्यांचा शोध घेतला जात आहे.
गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी गणेशखिंड रोडवरील मोदीबाग येथील घरासमोरील रस्त्यावर उतरले व वाहनचालकाला त्यांनी कामशेत येथे एका कामासाठी पाठविले होते़ त्यानंतर ते बेपत्ता झाले होते़ व्यवसायात नुकसान झाले असून आपण आत्महत्या करीत आहोत, अशी चिठ्ठी त्यांनी लिहून चालकाकडे दिली होती. त्यानंतर त्यांचा शोधासाठी पुणे पोलिसांनी शहरात सर्वत्र शोध घेतला पण ते कोठेही आढळून आले नाही़ दरम्यान, राज्यातील सर्व पोलिसांना गौतम पाषाणकर यांची माहिती पाठवून त्यांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली़ त्यात कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंट बाहेर पाषाणकर हे आढळून आले़ ते सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्यात आले असून त्यांनी त्यांना ओळखले आहे़ कोल्हापूरमधील हॉटेलमध्ये ते रहात असावेत, असा संशय असून त्यादृष्टीने शोध घेतला जात आहे़ या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले़