पुणे : प्लास्टिक बंदी लागू झाली अाणि अनेक व्यवसायांना याचा माेठा फटका बसला. त्यातही हाॅटेल व्यवसायावर याचा माेठा परिणाम दिसून अाला. हाॅटलमधून ग्राहकांना पार्सल हे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये दिले जात असे. त्याचबराेबर हे कंटनेर नेण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचाच वापर करण्यात येत हाेता. परंतु प्लास्टिक बंदीमुळे या कंटेनरचा अाणि प्लास्टिक पिशवीचा वापर करणे व्यावसायिकांना शक्य नाही. पार्सलच्या या समस्येवर पुण्यातील एका हाॅटेल व्यावसायिकाने भन्नाट कल्पना शाेधून काढली असून हाॅटेलमधील पार्सल हे थेट स्टीलच्या डब्ब्यात देण्यास अाता सुरुवात करण्यात अाली अाहे. या पद्धतीला पुणेकरांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे.
पुण्यातील कलिंगा हाॅटेलमध्ये पार्सल हे स्टीलच्या डब्यातून घरपाेच देण्याची सुविधा सुरु करण्यात अाली अाहे. प्लास्टिक बंदीनंतर पार्सलसाठी उपाय शाेधताना ही कल्पना समाेर अाली. पार्सलसाठी अार्डर अाल्यानंतर हाॅटेलमधून ते पार्सल एका स्टीलच्या 3 ताळ्याच्या डब्ब्यात देण्यात येते हा डबा एका कापडी पिशवीत घालून ग्राहकाच्या घरी नेला जाताे. ग्राहकांना पार्सलची अार्डर फाेनवरुन घेताना जेवण काढून घेण्यासाठी भांडी तयार ठेवण्यासाठी सांगण्यात येते. हाॅटेलचा कर्मचारी डब्यांमधील पार्सल ग्राहकांच्या भांड्यामध्ये काढून देताे व स्टीलचा डबा घेऊन परत येताे. एखादा ग्राहक हाॅटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी अाल्यास या डब्यासाठी काही डिपाॅझिट ठेवून घेतले जाते व डबा परत केल्यानंतर ते परत केले जाते. अश्या पद्धतीने स्टीलच्या डब्यात पार्सल देणारे कलिंगा हे पहिलेच हाॅटेल असून या पद्धतीला पुणेकरांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत अाहे. हाॅटेल तर्फे प्लास्टिकच्या स्ट्राॅ एेवजी कागदी स्ट्राॅ तसेच लाकडी स्टेरर वापरण्यात येत अाहे.
या कल्पनेविषयी बाेलताना कलिंगाचे मालक तसेच पुणे रेस्टाेरंट अॅण्ड हाॅटेलिअरस असाेसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी अाधी दाेन दिवस अाम्ही या प्रकारे पार्सल देण्यास सुरुवात केली. या पद्धतीला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळताेय. तसेच प्लास्टिक बंदीमुळे अामच्या व्यवसायावर हाेणारा परिणाम यामुळे कमी झाला अाहे. सध्या पार्सलसाठी अाम्ही 20 स्टीलचे डबे अाणले अाहेत. ग्राहकांनी त्यांच्या भांड्यात जेवण काढून घेऊन अाम्हाला डबा परत करायचा अाहे. ताे डबा धुण्याचीही गरज नाही. प्लास्टिक बंदी बाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागतच अाहे मात्र जगभरात 50 कायक्राेनच्या पिशव्यांना बंदी नाही. या पिशव्या रिसायकल करता येतात. त्यामुळे या पिशव्यांवरील बंदी हटवायला हवी.