पुणे : पुणे नगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेमध्ये 1952 मध्ये रुपांतर करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापाैर म्हणून बाबुराव सणस यांनी कार्यभार स्विकारला. दाेन वेळा महापाैर राहिलेल्या सणस यांनी पुण्याचा माेठ्याप्रमाणावर विकास केला. 18 नाेव्हेंबर 1978 ला सणस यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या स्मृतीदिनी प्रत्येक महापाैर त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वारगेट येथील त्यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येत असत. परंतु सध्या महापाैर पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने निवडणुकीच्या कामात ''बिझी'' असल्याचे सांगत पुण्याच्या महापाैर सणस यांना अभिवादन करण्यास त्यांच्या स्मृतिस्थळाकडे गेल्या नाहीत. त्यामुळे सणस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली असून इतिहासात असे पहिल्यांदाच घडल्याचे ते म्हणाले.
पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर बाबुराव सणस हे महापाैर झाले. दाेनदा त्यांना महापाैर हाेण्याचा मान मिळाला. या काळात त्यांनी पुण्याचा माेठ्याप्रमाणावर विकास केला. त्यांच्या निधनानंतर दरवर्षी 18 नाेव्हेंबरला पुण्याचे महापाैर त्यांना अभिवादन करण्याठी त्यांच्या स्वारगेट येथील पुतळ्याजवळ जातात. ही एक प्रकारे परंपरा आहे. परंतु यंदा पुण्याच्या महापाैर व नवनिर्वाचित आमदार मुक्ता टिळक या सणस यांना अभिवादन करण्याठी गेल्याच नाहीत. त्याचबराेबर महापालिकेचे काेणी अधिकारी देखील उपस्थित नव्हते.
आश्चर्य म्हणजे आदल्या दिवशी महापाैर सणस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापाैर येणार असल्याचे सणस कुटुंबियांना सांगण्यात आले हाेते. सणस कुटुंबिय प्रथेप्रमाणे सकाळी 9.30 वाजता पुतळ्याजवळ गेले. परंतु त्यावेळी महापाैर आल्या नाहीत. त्यानंतर त्या 11.30 वाजता येतील असे सांगण्यात आले. परंतु 11.30 वाजता देखील महापाैर न आल्याने सणस कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. महापाैरांच्या अनुपस्थितीमुळे चालत आलेल्या परंपरेला छेद गेला आहे.
याविषयी लाेकमतशी बाेलताना बाबुराव सणस यांचे पुत्र सुभाष सणस म्हणाले, ''बाबुराव सणस यांनी पुण्याच्या विकासात माेठी भर घातली. त्यांच्या स्मृतिदिनी आजपर्यंत प्रत्येक महापाैर येऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत असे. काल छगन भुजबळ पुण्यात हाेते. ते आजच्या कार्यक्रमाला थांबणार हाेते. परंतु परंपरेप्रमाणे महापाैर येत असल्याचे त्यांना कळविले. त्यामुळे ते मुंबईला रवाना झाले. आम्ही सकाळपासून महापाैरांची वाट पाहत हाेताे. परंतु महापाैर आल्या नाहीत. दुपारी 11.30 वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली. महापाैर निवडणुकीमध्ये त्या बिझी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. सणस यांना अभिवादन करण्यासाठी महापाैरांना 10 मिनिटे सुद्धा नाहीत याचे दुःख वाटते. यापुर्वी असे कधीच घडले नव्हते.''