पुणे : येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पुण्याचा पारा अगदी ८ अंशापर्यत खाली घसरले जाण्याची शक्यता आहे. तसेच यंदा पाऊस जास्त झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठी कडाक्याची थंडी पडणार आहे. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंची सरमिसळ पाहायला मिळू शकणार आहे. २० डिसेंबरपासून 'रॅपिड' थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले दिसून येईल, असा अंदाज असे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
यंदा २० डिसेंबर ते साधारणपणे २० मार्च या विषुवदिनापर्यंत असा तीन महिन्यांचा हिवाळा असणार आहे. त्या पाठीमागचे शास्त्रीय कारण साडे 23 अंश कललेल्या पृथ्वीच्या आसामुळे ती स्वतः भोवती फिरताना म्हणजे परिवलन व सूर्याभोवती परिभ्रमण हे आहे. असेही प्रा जोहरे यांनी सांगितले.
जोहरे म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. भौगोलिक परिस्थितीनुसार विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त व वेगाने घसरण दिसून येईल. त्यानंतर मराठवाड्यात औरंगाबाद आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये वेगाने तापमानात घसरण दिसून येईल. महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर आणि पानांवर गोठलेले दवबिंदू दिसून येतील असे ही ते म्हणाले.
यंदा हिवाळ्यात असेल हा बदल...
गेल्या वर्षी थंडी १५ नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती यावर्षी ती १५ डिसेंबरनंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल. सध्या उत्तरेकडून वारे दक्षिणेकडे जात आहेत परिणामी थंडी उत्तर ते दक्षिण अशी भारतात वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी विदर्भ, नंतर मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात जास्त घसरण होते आहे.
दिवसा 'नोव्हेंबर हिट' आणि रात्री 'कोल्ड शाॅक' आताचे 'न्यू नाॅर्मल' असणार असून बदललेला मान्सून पॅटर्न व बदललेल्या वादळाच्या पॅटर्न मध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असणार आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे दिवसभर उकाडा आणि साधारणपणे सायंकाळी साडे चार वाजेनंतर तापमानात वेगाने होणारी घसरण आणि रात्री महाराष्ट्रातील तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले असे नवीन वातावरण नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे अशी माहिती प्रा.जोहरे यांनी दिली आहे.
......
मान्सून आणि चक्रीवादळे
यंदा ऑक्टोबरमध्ये यंदा एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही. मान्सून संपताना चक्रीवादळांची निर्मिती होते. अशी चक्रीवादळे, पाऊस आणि गारपीट हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच डिसेंबर व जानेवारी २०२१ मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल.