पुणे : बिनतारी संदेश विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्याबरोबर देशपातळीवर सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान वापर असे दोन पारितोषिक मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असणारे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची आता पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ काम केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) ते पोलीस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली.
डिजिटल दळवणळण प्रणाली, उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा व डिजिटल रेडीओ ट्रॅकिंग प्रणाली अशा सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र पोलिस दलाकडून केला जातो. तंत्रज्ञानातील बदलाच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधांनी परिपुर्ण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इनोवेशन सेंटरची निर्मिती बिनतारी संदेश विभागाने केली आहे. विभागातील जे. सी. बोस ई-लर्निंग सेंटर, डिजिटल क्लासरूममध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व इतर राज्यातील पोलिस दलातील २५० पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राज्य बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयामध्ये आर्यभट्ट हे खुले संग्रहालयही रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे.
त्यानंतर गेल्या वर्षी सीआयडीमध्ये बदली झाल्यावर रितेश कुमार यांनी येथील गुन्हे निर्गती वेगवान होण्यासाठी प्रयत्न केले. पुण्यात झालेल्या डीजी कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या कॉन्फरन्सच्या आयोजनात रितेशकुमार यांचा महत्वाचा वाटा होता.