पुणे : अंघाेळीची गाेळी आणि खिळेमुक्त झाडं हे उपक्रम राबविणारे माधव पाटील सध्या नाेटासाठी मतं मागत आहेत. सध्या निवडणूक लढवत असलेले राजकीय पक्ष मूळ प्रश्न साेडून इतर मुद्द्यांवरच भर देत असल्याने नाेटा ला मतदान करण्याचं आवाहन पाटील करत आहेत. त्यांनी साेशल मीडियावर सध्या माेहीम सुरु केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी नाेटाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
माधव पाटील यांनी अंघाेळीची गाेळी आणि खिळेमुक्त झाडं ही माेहीम राबवली हाेती. त्यांच्या खिळेमुक्त झाडांची माेहिमेला राज्यातच नाहीतर देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. सध्या निवडणुका असल्याने ते नागरिकांना नाेटाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अनेकदा कुठल्याच पक्षाचा उमेदवार आवडत नसताना केवळ पर्याय नाही म्हणून एखाद्या उमेदवाराला मतदान केले जाते. त्यामुळे केवळ करायचे म्हणून मतदान करु नका तर उमेदवार पसंतीचा नसेल तर सरळ नाेटाला मतदान करा असे आवाहन ते करत आहेत. त्याचबराेबर नाेटामुळे तुमचं मतदान वाया जाईल असे न समजता नाेटा हे सुद्धा तुमचं मतच आहे. त्यामुळे नाेटाला मतदान करण्यास ते सांगत आहेत.
त्याचबराेबर पाटील यांनी 10 विविध मुद्दे काढले असून त्याच्यावर काेणत्याही पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख न केल्याने रागाच्या भावनेतून पाटील नाेटाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. लाेकमतशी बाेलताना पाटील म्हणाले, नाेटा ही राजकीय पक्षांना चपराक आहे. जर तुम्हाला कुठल्याच राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल तर तुम्ही नाेटाला मतदान करा. नाेटा हे सुद्धा तुमचे एक मतच आहे. एखाद्या मतदार संघात नाेटाला जास्त मतं मिळाली तर तिथल्या राज्यकर्त्यांवर देखील अंकुश राहील. तसेच राजकीय पक्ष जनतेशी नीट वागतील. मागच्या लाेकसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 60 लाख लाेकांनी नाेटाला मत दिले हाेते. सध्याचे सर्वच राजकीय पक्ष देशातील महत्त्वाच्या मुद्दांवर बाेलत नसल्याचे चित्र आहे.