पुणे : पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांची सातारा येथे पाेलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात सातपुते यांचा देखील समावेश आहे. तर साताऱ्याचे पाेलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुण्यात उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तेसस्वी सातपुते यांची पुणे शहर वाहतूक उपायुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हेल्मेटसक्तीचा निर्णय आणि त्याची कठाेर अंमलबजावणी देखील त्यांनी केली. त्याचबराेबर वाहतूकीला शिस्त लागण्यासाठी अनेक पथदर्शी प्रकल्प सुद्धा त्यांनी राबविले. वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांना ई-चलानच्या माध्यमातून देखील दंड ठाेठावण्यात आला. या दंडाची देखील माेठ्याप्रमाणावर वसूली करण्यात आली. हिंजवडीतील वाहतूकीचा प्रश्न साेडविण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले हाेते.
दरम्यान शहरात पुन्हा एकदा माेठ्याप्रमाणावर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चाैकचाैकात पाेलीस नियम ताेडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. या हेल्मेट सक्तीच्या कारवाईमुळे हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.