तेजस टवलारकर-पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांच्या घरात आहे. कोरोनापूर्वी यातील ३ लाख कर्मचारी हे कंपनीने नेमून दिलेल्या कंत्राटी वाहतूकदारांच्या बसने रोज ये-जा करत होते. एका कर्मचाऱ्याला ने-आण करण्यासाठीचा खर्च २५०० रुपये आहे. या व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ४ ते ५ लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
मार्चपासून वर्क फ्रॉम होम असल्याने कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे काम बंद आहे. बहुतांश कंपन्यांनी वाहतूक कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बंद झाला आहे. कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसाठी लागणारे सर्व साहित्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. पुढील काही महिने वर्क फ्रॉम होम सुरू राहण्याची शक्यता आहे. कंपन्या सुरू झाल्या तरी ३० टक्केच कर्मचारी कंपनीत येतील असा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कंत्राटदारांचा व्यवसाय सुरू होणे सध्या तरी अधांतरी आहे.
आयटी कर्मचाऱ्यांचा मार्चपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा वाहतूक व्यवसायाला बसला आहे. यामुळे वाहतूक व्यवसायाला दरमहा ७५ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात आयटी कंपन्या आल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. अनेक व्यवसाय सुरू झाले. दोन्ही शहरांना आयटी कंपन्यांमुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाला. पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहाराची ओळख ही जागतिक पातळीवर झाली. देशभरातून आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी नागरिक शहरात येतात. वर्क फ्रॉम होममुळे बाहेरगावाहून, राज्यातून आलेले कर्मचारी आपल्या गावी गेले आहेत. याचा मोठा फटका दोन्ही शहरांना बसला आहे.
कोरोनापूर्वी हिंजवडी, खराडी, मगरपट्टा, तळवडे, फुरसुंगी या आयटी पार्कमध्ये नेहमी वाहतूककोंडी होत होती. वाहतूककोंडीचे कारण पुढे करत काही कंपन्यांनी स्थलांतरण करण्याच्या विचारात होत्या. सध्या या सर्व आयटी पार्कमध्ये शुकशुकाट आहे.
---कोरोनापूर्वी दरमहा कंत्राटी वाहतुकीने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या
आयटी पार्क कर्मचारी संख्याहिंजवडी ( तिन्ही फेज) १.५० लाख
खराडी २५ हजारमगरपट्टा ४० हजार
तळवडे २५ हजारफुरसुंगी १५ हजार
---कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून वाहतूक व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरमहा ७५ कोटींचे नुकसान होत आहे. या व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ४ ते ५ लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. बहुतांश कंत्राट रद्द झाले आहेत.
- किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस ओनर्स असोसिएशन