पुणे - परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पत्राद्वारे पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोस्टाद्वारे तुकाराम मुंढेंना ही धमकी देण्यात आली असून, मुंढेंनी याची तक्रार पोलिसांत केली आहे. मुंढेंच्या कुटुंबीयांनाही ठार मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली.भुजंगराव मोहिते नामक या व्यक्तीने हे पत्र लिहिलं असून, पत्रात डोळे फोडू, हातपाय तोडून तुम्हाला ऑफिसबाहेर फेकून देऊ, असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तुकाराम मुंढेंना संरक्षण दिलं आहे. तत्पूर्वी शुक्रवारी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास कार्यालयीन टपालातून हे पत्र मिळाले. या प्रकरणी मुंढे यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पीएमपीचे सीएमडी आणि धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांना पुन्हा धमकीच पत्र आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आधीच्या पत्राबाबत मुंढे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर मुंडे यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्यात आलं होतं. मात्र पुन्हा हे पत्र आल्यानं पोलिसांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पुण्यात 1975-76च्या दरम्यान अभिनव महाविद्यालयातील राजेंद्र जक्कळ, दिलीपकुमार, सुहास चांडक, शहा यांनी जोशी, अभ्यंकर, हेगडे आणि बाफना या कुटुंबीयांची हत्या केली होती या हत्याकांडाचा दाखला देत तुमच्यासह कुटुंब उद्ध्वस्त करू, असा पत्रातून धमकीवजा इशारा दिला आहे. ज्येष्ठांच्या पासाची रक्कम कमी करावी अशी मागणी या धमकीच्या पत्रात करण्यात आली आहे.सुखसागर परिसरात वास्तव्याला असलेल्या भुजंगराव मोहिते नामक व्यक्तीने हे पत्र पाठवले असून, पत्रात मुंढेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तुम्ही मनमानी कारभार करत आहात, तिकीट दर वाढवल्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झालेय, तुमचा मनमानी कारभार न थांबवल्यास तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. धमकीप्रकरणी मुंढे म्हणाले, दुपारी चार वाजता कार्यालयीन पोस्टातून हे पत्र आले आहे. पत्रातील मजकूर वाचल्यानंतर रितसर तक्रार नोंदवली आहे. आता पोलीस पुढील तपास करतील.
पुण्याचे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 9:58 PM