पुणे : शहरातील कचरा, पाणी, स्वच्छता, प्रदुषण या समस्या गंभीर होत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये सर्वांना पाणी देणे अवघड आहे. शहरात रोज नव्याने बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. पुण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी याचे योग्य नियोजन केले नाही तर अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे काही महिन्यांसाठी थांबवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नावर सुळे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पाणी, स्वच्छता, रस्ते, वारजे रुग्णालय या विषयावर चर्चा झाली. त्यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके आदी उपस्थित होते.
शहरात गेल्या पाच वर्षांपासून समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे, त्याचा फायदा होत नाही. त्यातच शहरात नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या जात असून, यासाठीच्या पाण्याचे नियोजन कसे करणार आहे. मी विकासाच्या विरोधात नाही, पण सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पाणी वापराचे नियोजन कसे असणार आहे याची माहिती आम्हाला द्यावी. अन्यथा आम्ही महापालिकेला घेराव घालू, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
छोटे प्रश्न सोडविता येत नाही-
गेल्या दोन वर्षापासून निवडणुका न झाल्याने महापालिकेत नगरसेवक नाहीत. राज्य सरकार आणि प्रशासन यांना नागरिकांचे छोटे प्रश्न सोडविता येत नाहीत. फक्त कोट्यावधी रुपयांचे मोठे प्रकल्प केले जात आहेत अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.