पुणे - पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाण्याच्या विषयावर जाहीर बोलणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्याच नगरसेवकांमध्ये राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्यानेच कोणी याबाबत बोलण्यास तयार नाही.पुण्यासाठी दररोज घेण्यात येणारे पाणी ११५० एमएडी (दशलक्ष लिटर) करण्याचा निर्णय कालवा समितीत घेण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी लगेचच महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याच्या पाण्याचे नियोजन करीत असल्याचे जाहीर केले. त्याचा प्रतिवाद बापट यांनी त्याच दिवशी संध्याकाळी त्वरित मुंबईतून केला व पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे जाहीर केले. भाजपाच्या या दोन नेत्यांमधील विसंवाद त्या दिवशी प्रथमच उघड झाला. त्यानंतर आजपर्यंत बापट यांनी एकदाही पुण्याच्या पाण्यावर एका शब्दाचेही भाष्य केलेले नाही. महापालिकेच्या पदाधिकाºयांची पाण्याचे नियोजन करताना होत असलेली ससेहोलपटही त्यांनी दुर्लक्षित केलेली दिसत आहे. कालवा समितीत निर्णय झाल्यावर १० नोव्हेंबरनंतर लगेचच जलसंपदाने १ हजार ३५० एमएलडी पाणी देण्यास सुरुवात केली. सलग ५ तासांचा निर्णय घेण्यात आला व तसे जाहीरही करण्यात आले. पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी मागणी नसतानाही पाणी सोडले गेले. त्याकडे राजकीय लक्ष दिले गेले नाही. चांगला पाऊस व धरणात पाणी असतानाही पुण्याचे पाणी कमी करण्यात आले, यावरही कालवा समितीत भाष्य करण्यात आले नाही. पदाधिका-यांमध्ये नाराजी आहे. पाण्याच्या वाढीव कोट्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न होत नसल्याकडे काही भाजपा पदाधिकाºयांकडून लक्ष वेधले जात आहे.पालकमंत्री बापट यांना त्यांच्या पाणी प्रश्नावरील मौनाबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. प्रश्न व्यवस्थित हाताळला जात आहे; त्यामुळे यावर मी बोलण्याचा काहीही संबध नाही, असे ते म्हणाले. पाण्याच्या प्रश्नावर भाजपामध्येच राजकारण होते आहे, याचा इन्कार करीत त्यांनी ती जबाबदारी आम्ही विरोधी पक्षांवर टाकली आहे, असे सांगितले. योग्य वेळ येताच आपण या विषयावर जाहीरपणे बोलू, असे ते म्हणाले.
पुण्याचा पाणीप्रश्न : पालकमंत्र्यांचे मौन पक्षातील गटबाजीला कंटाळून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:19 AM