पुणे : जगभरात मी टू चळवळ जाेर धरत असताना अाता पुण्यातील तरुणाई स्त्रीयांच्या मदतीसाठी पुढे अाली अाहे. कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत वी टु (वी टुगेदर) या समितीची स्थापना केली असून या समितीमार्फत लैंगिक अत्याचार पिडीत महिलांना कायदेशीर मदत अाणि समुपदेशन करण्यात येणार अाहे.
मी टू चळवळीतून सिनेसृष्टीतील लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे समाेर अाली. अनेक अभिनेत्री, महिला पत्रकार पुढे येत अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फाेडली. याच चळवळीतून प्रेरणा घेत पुण्यातील तरुणाईने वी टु ही समिती स्थापन केली. सामान्य महिलांमध्ये अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत जाहीर वाच्यता करण्याची हिंम्मत नसते. तर काहींना अापली अाेळख उघड झाल्याने अापली बदनामी हाेईल असे वाटत असते. त्यांच्याकडे त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी कुठलेही व्यासपीठ नसते. अशा महिला, विद्यार्थीनींना या वी टु समितीच्या माध्यमातून मदत करण्यात येणार अाहे. या महिलांचे समुपदेशन करुन त्यांना कायदेशीर मदत पुरविण्यात येणार अाहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या कल्याणी माणगावे, मृद्गंधा दीक्षित, शर्मिला येवले, स्वाती कांबळे, सारिका अाखाडे, भूषण राऊत, दीपक चटप, अादर्श पाटील, नितीन जाधव या विद्यार्थ्यांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली अाहे.
याविषयी बाेलताना कल्याणी माणगावे म्हणाली, मी टू चळवळीनंतर अनेक विद्यार्थींनीनी अाम्हाला त्यांच्या साेबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले. त्यांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत वाचा फाेडण्यासाठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. तसेच अापली अाेळख समाेर अाल्याने अापली बदनामी हाेईल याची त्यांना भीती हाेती. अनेक महिला या साेशल मिडीया वापरत नाहीत किंवा त्यांना या मी टू चळवळीबाबत फारसे माहित नाही. अशा महिलांना व विद्यार्थीनींना मदत करण्यासाठी अाम्ही वी टू ही समिती स्थापन केली. राज्यातील कानाकाेपऱ्यात अाम्हाला ही समिती न्यायची असून अनेक लाेकांना अामच्याशी जाेडायचे अाहे. जेणेकरुन स्त्रियांवर हाेणाऱ्या अत्याचाराला वाचा फाेडता येईल.