आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. मात्र लाखो रुपये खर्चूनही आळंदीकरांना पिण्यासाठी हक्काचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. मागील काही दिवसांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ मलमिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांना पिण्यासाठी विकत पाणी खरेदी करण्याची वेळ ओढवली आहे.
आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाॅटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्रातून नळाद्वारे मलमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, मागील आठ दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी विकत जार आणावे लागत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“ नळाद्वारे गढूळ पाणी वितरीत केले जात असल्यामुळे आम्हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. या पाण्याचा उग्र वास येत असून अतिशय गढूळ पाणी आहे. परिणामी जुलाब, उलट्या, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.
- संदीप नाईकरे, नागरिक
फोटो ओळ : हा घ्या पुरावा... आळंदीत रविवारी (दि.१७) नळाद्वारे वितरित झालेले काळेकुट्ट पाणी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)