पुणे : घटस्फोटीत महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस दलातून बडतर्फ केले. तसेच बेकायदेशीरपणे फॉच्युनर गाडी ताब्यात ठेवणे, जप्त केलेले २८ लाख रुपये तपासात न दाखविणे व गुन्ह्याच्या तपासात संशयास्पद व बेशिस्त वर्तनामुळे एक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकाना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा देताना पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याने शहर पोलीस दलातील अनेक कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी एक महिला सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राजाराम मदने (वय ३६) यांच्याकडे भेकराईनगर येथे आली होती. तिला कौटुंबिक न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्याऐवजी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिने लग्नाचे विचारल्यावर मदने याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अटक करण्यासाठी गणवेशबदलण्यास सांगितले असता पोलीस ठाण्यातून मदने याने पलायन केले. त्याला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशीत दोषी ठरल्याने सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तपासात कसुरी केल्याबद्दल तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शेटे आणि सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर यांना पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मधील या प्रकरणात सहायक निरीक्षक बी. एम. रायकर यांनी ५ महिन्यात काहीही तपास न केल्याचे दिसून आले नाही.
आरोपी व्यंकटेश याच्या म्हणण्यानुसार, त्याने रायकर यांना रिकव्हरीत २८ लाख रुपये दिले. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार व्यंकटेश व त्याची पत्नी ममता यांच्याकडून ३० ते ४० लाख रुपये रिकव्हरी म्हणून जमा झाले आहेत. मात्र, रायकर व श्रीकांत शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी कोणतीही रिकव्हरी झाली नसल्याचे सांगितले. व्यंकटेशच्या पत्नीने गुन्ह्यात रिकव्हरी करीता फॉर्च्युनर गाडी रायकर यांच्या ताब्यात दिली होती. ही गाडी ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता आरोपीस परत न देता पुणे येथे ठेवल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. रायकर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी फॉर्च्युनर गाडी विषयी अनभिज्ञ आहोत, असे दाखवत आहेत.
बंगलोर येथे तपासाला जाऊनही त्याबाबत गुन्ह्याचे कागदपत्रांमध्ये अथवा वरिष्ठांना कोणताही अहवाल सादर केलेला नाही. श्रीकांत शिंदे यांना गुन्ह्याचे कागदपत्रे तपासणीदरम्यान संपर्क करुन हजर राहण्याबाबत सहायक पोलीस आयुक्तांनी सुचित केले असताना ते चौकशीसाठी एकदाही हजर झाले नाहीत. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासावरील त्यांचे पर्यवेक्षण नसल्याचे दिसून येते. श्रीकांत शिंदे व रायकर यांची सचोटी संशयास्पद दिसून येत असून त्यांच्या बेजबाबदार व बेशिस्त वर्तनमुळे खटल्यात आरोपीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांना पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दोन वर्ष वेतनवाढी रोखण्याची शिक्षा दिली आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळणेकामी मदत करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून एजंटशी संगनमत करुन १ लाख रुपये स्वीकारली असल्याबाबतचे ऑडिओ रेकॉडिंग अर्जदाराने सादर केले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारे वर्तन असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी पोलीसउपनिरीक्षक संतोष केशव सोनवणे यांना ३ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे.
या शिक्षांची माहिती समजल्यावर पोलीस कर्मचार्यांना साध्या कसुरीबद्दल थेट बडतर्फ केले जाते तर अधिकार्यांना मात्र गंभीर गुन्ह्यात केवळ वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली जात असल्याची चर्चा शहर पोलीस दलात सुरु झाली आहे.
* या वर्षात आतापर्यंत पोलीस दलातून किमान १० जणांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यातील काही जण २ ते ३ वर्षे कारणाशिवाय गैरहजर होते.* वरिष्ठ पोलीस अधिकार्यांविषयी काही वक्तव्य वारंवार केल्याने एकासहायक फौजदाराला फेब्रुवारी महिन्यात बडतर्फ केले होते.* एका बाजूला १ लाख रुपयांची लाच घेतलेल्या अधिकार्याला वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली जात असता पोलीस व्हेरिफिकेशनसाठी ५०० रुपयांची लाच मागितली, अशा फिर्यादीच्या तक्रारीवरुन महिला पोलीस काँस्टेबलला बडतर्फकरण्यात आले होते.* पोलीस अधिकार्यांविषयी सहानुभूतीने विचार केला जातो, त्याचवेळी त्याच प्रकारच्या कसुरीबद्दल पोलीस कर्मचार्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावली जात असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु झाली आहे.