पुणे : पुण्यातील वाहतूकीची समस्या सर्वश्रुत आहे. शहराची लाेकसंख्या साधारण 35 लाख आहे तर शहरातील वाहनांची संख्या 36 लाखाहून अधिक. त्यातच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेमध्ये पुणे शहरात देशातील सर्वात जास्त ध्वनीप्रदूषण हाेत असल्याचे समाेर आले आहे. वाहनचालक विनाकारण हाॅर्न वाजवत असल्याने पुण्यातील रस्त्यांवर केवळ हाॅर्नचा गाेंगाट ऐकू येत असताे. पुण्यातील ध्वनी प्रदूषण कमी व्हावे यासाठी लाईफ सेविंग फाऊंडेशन या संस्थेकडून आज पुण्यात नाे हाॅर्न डे राबविण्यात येत आहे. ज्यात नागरिकांना हाॅर्न न वाजविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यातील ध्वनीप्रदूषणात सातत्याने वाढ हाेत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने यात आणखीनच भर पडत आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आराेग्यावर देखील परिणाम हाेत असतात. भारतातील शांत असणारं शहर आता गाेंगाटाचं शहर हाेत चालले आहे. त्यामुळे लाईफ सेविंग फाऊंडेशनकडून हा नाे हाॅर्न डे राबविण्यात आला. ज्यात या संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील 20 ठिकाणी नागरिकांना हाॅर्न वाजविण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे हे पहिले वर्ष हाेते.
याबाबत बाेलताना संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाठक म्हणाले, गेल्या वर्षाच्या एका राष्ट्रीय सर्वेमध्ये पुणे शहर हे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेले शहर असल्याचे समाेर आले हाेते. त्यातच शहरात लाेकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. मिझाेरामच्या राजधानीमध्ये लाेक हाॅर्न वाजवत नाहीत. त्यामुळे तेथे माेठ्याप्रमाणावर शांतता असते. तसाच उपक्रम आपल्या शहरात राबविवा या हेतून हा उपक्रम सुरु केला. दरवर्षी 12 डिसेंबरला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्याआधी मी स्वतः हाॅर्न न वाजवता आपण व्यवस्थित गाडी चालवू शकताे का याचा अंदाज घेतला. गेल्या सहा महिन्यात मी केवळ एकदा हाॅर्न वाजविला आहे. त्यामुळे हाॅर्न न वाजवून आपल्या शहराला शांत ठेवणे आपल्या सर्वांना शक्य आहे.