पुणे : शहरात नायलॉन मांजामुळे नागरिक, पक्षी जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मांजाचा वापर करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या तीन दिवसांत पालिकेच्या घनकचरा विभागाने ३४० ठिकाणी पाहणी करून १० जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून शुक्रवारपासून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी नगर रस्ता - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ११ ठिकाणी, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४ ठिकाणी, वारजे कर्वेनगरच्या हद्दीत १९ ठिकाणी, हडपसर-मुंढवा येथे ९, भवानी पेठ परिसरात ३० तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२ अशा एकूण ८५ ठिकाणी तपासणी करण्यात आली.शनिवारी कोथरुड-बावधनच्या हद्दीत १५ ठिकाणे तपासून ४ जणांवर, हडपसर मुंढव्याच्या हद्दीत ६ ठिकाणी तपासणी करून सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण २१ ठिकाणे तपासण्यात आली. १० जणांकडून २५ हजार ५०० रुपयांचा दंड महापालिकेकडून वसूल करण्यात आला. मकरसंक्रांतीच्या दिवशी हडपसर मुंढवा परिसरात ३५, तर भवानी पेठ परिसरात ३५ ठिकाणांसह अन्य २३४ ठिकाणी मांजाची पाहणी करण्यात आली. अशा एकूण ३४० ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली.