दौंड : तालुक्यातील तीन बेकायदेशीर शाळांवर तीन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करून या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा मूळ जागेवर कार्यरत नसल्यामुळे या शाळेला ११ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी दिली.
ज्ञानप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल ( दौंड), अभंग शिशु विकास विहार बाल विकास ज्ञानमंदिर ( कासुर्डी), क्रेअंश इंग्लिश मीडियम स्कूल ( कासुर्डी) या तीन बेकायदेशीर शाळा बंद करण्यात आल्या असून, या तिन्ही शाळांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे, तर श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल या शाळेला लिंगाळी हद्दीतील बालाजीनगर येथे परवानगी असताना सदरची शाळा लिंगाळीजवळील अशोकनगर परिसरात येथे कार्यरत असल्यामुळे या शाळेला ११ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील बेकायदेशीर शाळांची मोहीम सुरू असून, वेळेत कामकाज करण्यासंदर्भात पाच शिक्षकांना ताकीद देण्यात आली आहे, असे किसन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली असता. या शोधमोहिमेंतर्गत १४८ विद्यार्थी निदर्शनास आले असल्याने त्यांना शाळेच्या प्रवाहात आणले आहे.
४० शाळांमध्ये उत्तम कामकाज
दौंड तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून या शाळेचे नाव यादीत घेतले आहे, याचबरोबरीने शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत दीडशेपेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या ३९ जिल्हा परिषद शाळा एकूण ४० शाळांचे काम उत्तमरीत्या सुरू आहे, असे किसन भुजबळ म्हणाले.
...म्हणून त्यांना बंदूकधारी सुरक्षा-
किसन भुजबळ हे गेली ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवेत असून, पुणे जिल्हा परिषद येथे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, दौंड येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी आणि प्राथमिक शाळेतील बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणल्यामुळे तसेच बोगस शिक्षण संस्थांवरील कारवाई पाहता. त्यांचा पाठलाग करीत तीन वेळा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने या तिन्ही हल्ल्यांतून ते बचावले परिणामी शासनाने त्यांना बंदूकधारी सुरक्षा दिली आहे.