लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विनोदाला दर्जा असतो, हे पुलंनी मला शिकवले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक कलाकृतीमध्ये विनोदाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. विनोद दारासिंगसारखा असावा, उघडा तरी सशक्त आणि दर्जेदार असावा. विनोदी कलाकृतीला कारुण्याची झालर असेल तर ती अधिक प्रभावीपणे रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते, असे सांगत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विनोदाची सदाबहार सफर रसिकांना घडवली.चौदाव्या पुलोत्सवामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, गायक सचिन पिळगावकर यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार’ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मुकुंद अभ्यंकर, नितीन ढेपे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन आणि सुप्रिया यांच्याशी अभिनेता स्वप्नील जोशी याने दिलखुलास संवाद साधला.सचिन म्हणाले, ‘माझी आणि विनोदाची ओळख पुलंनी करून दिली. तेव्हा पासून मी त्यांची पुस्तके वाचली आणि विनोदाशी नाते जपत मोठा होत गेलो. आजवरच्या प्रत्येक पुरस्काराने चेहर्यावर स्मित निर्माण केले. मात्र पुलोत्सव पुरस्काराने डोळ्यांत पाणी तरळले. याबद्दलची भावना शब्दबद्ध करता येणार नाही, ती केवळ अनुभवता येऊ शकेल.’‘पुलंनी माझ्यासाठी चित्रपट लिहावा, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना ‘ती फुलराणी’बाबत मी सुचवले. ते म्हणाले, ‘आ पण नव्या कलाकृतीबाबत विचार करू या. मी आता जुना झालो आहे. सध्याच्या पिढीबाबत तुला जास्त माहीत आहे. त्यामुळे तू माझ्याकडून लिहून घे, मी नक्की लिहीन.’ त्यांचा हाच मोठेपणा मनाला भावला. त्यांनी स्वत:ला श्रोत्यांना वाहून घेतले होते, असे सांगत त्यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.सुप्रिया म्हणाल्या, ‘पुलंचे गुण आपल्यामध्ये झिरपावेत, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यांचा मिस्कीलपणा, हजरजबाबीपणा अनोखा होता. पुल आणि सुनीताबाईंसारखे नातेच आमच्या दोघांमध्ये आहे, याचा अभिमान वाटतो.’
मग आम्हालापण घ्या की सिनेमातगिरीश बापट यांच्या मनोगतानंतर सचिन यांनी ‘बापट साहेब, तुमची विनोदबुद्धी खूप दांडगी आहे’, असे म्हटल्यावर, ‘मग आम्हालापण घ्या की सिनेमात’ असे हजरजबाबी उत्तर बापट यांनी देताच प्रेक्षागृहात हशा पिकला. ‘साहेब, हे सर्व रेकॉर्ड होत आहे, सिनेमासाठी विचारल्यावर नाही म्हणू नका’, अशी टिपण्णी सचिन यांनी केली.
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने येथे कलाकारांबद्दल प्रचंड प्रेम, आ त्मीयता आणि अभिमान आहे. रंगभूमीचा इतिहास एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सचिन तेंडुलकर आणि पिळगावकर यांनी इतिहास घडवला आहे. लोकांच्या खिशातून दोन पैसे काढणे सोपे; मात्र डोळ्यांतून दोन अश्रू काढणे अवघड असते. तेच पुल आणि सचिन यांना जमले. मलाही पुल आणि सुनीताबाईंचा सहवास लाभला. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक खाते आणि कलाकारांसह बैठक घेऊन नियोजन केले जाईल. जन्मशताब्दीचा दिमाखदार सोहळा पुण्यात पडेल. - गिरीश बापट, पालकमंत्री