लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. या साठी विविध परवानग्यांना मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, विमानतळ नक्की कोठे होणार हे कोडे अद्यापही सुटलेले नाही. नियोजीत जागेपासुन काही अंतरावरील रिसे पिसे परीसरातील जागा देखील विमानतळास योग्य आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होताच पुर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे,पांडेश्वर व संभाव्य विमानतळ बाधीत गावांनी राजुरी येथे शुक्रवारी बैठक घेऊन पुरंदर तालुक्यात विमानतळच नको म्हणुण तीव्र विरोध केला. आमच्या सोन्यासारख्या जमीनीवर विमानतळ लादल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष जागा अनिश्चिततेमुळे चर्चेचा विषय बनला आहे. पुण्याच्या उत्तरेला सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, नदीपात्रात करावा लागणारा बदल, टेकड्या, डोंगररांगा, सपाटीकरण, बागायती क्षेत्र व पुनर्वसन इत्यादी तांत्रिक अडचणी सांगत हा प्रकल्प पुरंदर तालुक्यात हलविण्यात आला. पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावातील दोन हजार चारशे हेक्टर जागेवर विमानतळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यास केंद्र व राज्य सरकारने देखील मंजुरी दिली. याचा प्रकल्प अवाहल देखील तयार करण्यात आले. मात्र, या गावातील ग्रामस्थांनी विमानतळ विरोधी समीती स्थापन करुन तीव्र विरोध दर्शवला. मात्र, विमानतळ पुरंदरमध्येच होणार पण जागेत बदल होणार याबाबत हलचाली सुरु होऊन पर्यायी जागा म्हणुण रिसे, पिसे, पांडेश्वर, राजुरी येथील जागा सुचवण्यात आली. या जागेची शासकीय स्तरावर पहाणी करुन विमानतळ आॅथोरीटी आॅफ इंडीयाने या जागेत विमानतळ करने शक्य असल्याचे जाहीर केले. याबाबत अनेक बातम्या देखील प्रशीद्ध झाल्या यामुळे पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी जमीनी जाणार म्हणुण चिंताक्रांत झाले असून सोन्यासारख्या जमीनी न देण्यासाठी आक्रमक बनले आहे. यासाठी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी राजुरी येथे बैठक घेऊन नियोजीत पुरंदर विमानतळास जमीनी न देण्याचा निर्णय घेऊन तीव्र विरोध केला. जर शासनाने बळजबरीने विमानतळाचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. या बैठकीत राजुरीचे सरपंच उद्धव भगत, शिवसेना समन्वयक गणेश मुळीक, शशिभाऊ गायकवाड, विपुल भगत, सागर चव्हाण, संपत भगत, सदाशिव चौंडकर, विश्वास आंबोले, शैलेश रोमण, अनिकेत भगत, माऊली शेंडगे, संतोष कोलते,
महेश कड, माऊली शेंडगे आदींनी आपली मनोगते व्यक्त करत विमानतळाला तीव्र विरोध दर्शविला.
कुठल्याही परिस्थितीत शासनाला विमानतळासाठी आम्ही येथील इंचभरही जागा देणार नाही व येथे विमानतळ होऊ देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी विमानतळाला कसा विरोध करायचा याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विमानतळ विरोधी घोषना देण्यात आल्या. सर्वांनी हात उंच करुन विमानतळाविरोधात लढण्याची शपथ घेतली .
१) पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात रिसे, पिसे, राजुरी,नायगांव, पांडेश्वर या गावात होवू घातलेले विमानतळ आम्ही कोणत्याही परिस्थिति मध्ये होवून देणार नाही. व प्रशासनाकडून तसा जबरदस्तीने प्रयत्न झाल्यास अतिशय आक्रमक पद्धतीने आम्ही सर्व शेतकरी मिळून आंदोलन करू.
-गणेश मुळीक, माजी सरपंच, पिसे.
चौकट
पुरंदर तालुक्यात छञपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असुन दोन ठिकाणच्या जागेचे पसंतीही करण्यात आली. मात्र हे विमानतळ नक्की कोठे होणार हे कोडे अद्यापही सुटलेले नाही. विमानतळासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आली. मात्र ज्या शेतऱ्रयांच्या जमीनी जाणार आहे त्यांना माञ आजही विश्वासात घेण्यात आले नाही.
फोटो ओळ : १) राजुरी (ता.पुरंदर) येथे विमानतळाला विरोध करण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सरपंच उद्धव भगत २) विमानतळास विरोध करण्यासाठी हात वर करुन शपथ घेताना ग्रामस्थ