मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील मासाळवाडी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी ओढ्यावरील बंधारे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरण्याचे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील लोणी भापकर, सायंबाचीवाडी, मासाळवाडी येथील ओढ्यावरील छोटे बंधारे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरण्याचे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. येथील विहिरीची पाणीपातळी खालावली असल्याने उन्हाळासदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने दुग्धव्यवसायही धोक्यात आला होता.यामुळे वारंवार होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीस्तव हे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु ठराविक भागातच याचा लाभ होणार असल्याने परिसरातील सर्व व्हॉल्व्हमधून अधिक क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी आहे. पुरंदर उपसा योजनेतून बारामतीच्या पश्चिम भागातील २२ गावांमधील पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. योजना कार्यान्वित झाली. मात्र, पूर्ण क्षमतेने पाझर तलाव भरले नव्हते. आता जानेवारी महिन्यातच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तलाव भरून घेण्याचे काम काही गावांमध्ये सुरू आहे. मात्र, सरसकट सर्व तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मासाळवाडी येथे ओढ्यामधील बंधारे भरले जात आहेत. मात्र तलावात पाणी सोडले नसल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही, असे मासाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य माणिक मासाळ यांनी सांगितले. तर यापूर्वीच पळशीच्या तलावात पुरंदर उपसा सिंचनचे पाणी दिले असते तर रब्बी पिकांना त्याचा फायदा झाला असता, असे माजी सरपंच दादा माने यांनी सांगितले. (वार्ताहर)
जिरायती भागात पुरंदर उपसाचे पाणी
By admin | Published: January 11, 2017 2:22 AM