सासवड : कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील शेतकरी ऋषी नानासाहेब तिवटे यांनी १२ गुंठे क्षेत्रात वांग्याची रोपे लागवड केली होती. त्यासाठी त्यांना अंदाजे ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. वांग्याचा पहिला तोडा केला. तेव्हा १००० रुपये मिळाले होते.
दुसरा तोडा केल्यानंतर पुण्यातल्या गुलटेकडी येथील बाजारात वांगी विक्रीसाठी आणली होती. मात्र ९५ किलो वांगी आणूनही शेतकऱ्याच्या हाती अवघे ६६ रुपये पडले. त्यामुळे नैराश्येतून या शेतकऱ्याने १२ गुंठे शेतातील वांग्याचे पीक उपटून टाकले. तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावेळी वांग्याला तीन रुपये प्रतिकिलो दर मिळाला. ९५ किलो वांग्यांचे एकूण २८५ रूपये झाले. यामधून १७ रुपये ५० पैसे हमाली गेली, ४ रूपये ७५ पैसे तोलाई दिली. ६ रूपये ७५ पैसे भराई तर १९० रूपये वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्याला ६६ रूपये इतकी रक्कम हातात आली. बाजारभाव नसल्याने व भांडवली खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
''वीज समस्या, बाजारभाव, वाहतूक, दलाल, आडते या सर्व समस्यांना तोंड देत शेतकरी भाजीपाला पिकवतात. तोडणी केल्यानंतर हा भाजीपाला बाजारात लगेच न्यावा लागतो. काही तासात तो विकला नाही तर तो खराब होतो. बाजारात माल पोहोचला नाही तर झाडावरून तोड करून तो माल फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातच बाजारभाव नसला की उत्पादकांना नुकसानीशिवाय हाती काही लागत नाही. - ऋषी तिवटे, वांगी उत्पादक शेतकरी''