Purandar Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुरंदर हवेली मतदार संघावर पुन्हा एकदा भगवा फडकला असून पुरंदर हवेली मतदार संघात सर्वांचाच अंदाज चुकवत शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतारे यांच्या बाजूने निकाल लागला आहे. यात तिरंगी लढतीचा फायदा विजय शिवतारे यांनाच झाला. सुमारे २४१८८ मतांच्या फरकाने विजय शिवतारे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव करून गेल्या निवडणूकीतील पराभवाचा वचपा काढला. युतीचे विजय शिवतारे यांना १ लाख २५ हजार ८१९ मते मिळाली तर विरोधी संजय जगताप यांना १ लाख १ हजार ६३१ मते मिळाली आहेत. तिसरे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांना ४७१९६ मते पडली आहेत. शिवतारेंच्या विजयात या तिसऱ्या उमेदवाराचा ही मोठा फायदाच झाला आहे.
आज सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान मोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच काँग्रेसचे संजय जगताप यांना १६१ मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर विजय शिवतारे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. शासनाची लाडकी बहीण योजना, हवेली तालुक्यातील पाणी प्रश्न , स्वतंत्र्य महापालिका त्याच बरोबर पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी, आणि विमानतळ या भोवतीच ही निवडणूक फिरली. यावं मुद्यावरूनच शिवतारेनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले होते. त्याला मतदारांनी ही भरभरून प्रतिसाद दिला. काँग्रेस चे उमेदवार संजय जगताप या मुद्यावर कमी पडले. यात निवडणूकीच्या रिंगणात अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे मोठा खर्च करून ही तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र त्यांची उमेदवारी विजय शिवतारे यांना मोठे यश देऊन गेली. झेंडे यांच्या रूपाने लोक सभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी अजित पवार यांनीच संजय जगताप यांचा करेकट कार्यक्रम केल्याची चर्चा मतमोजणी केंद्रावर होती.
प्रचारात संजय जगताप यांची मोठीं आघाडी दिसत होती.मात्र शरद पवारांच्या सभेने आपण विजयी झाल्याच्या संभ्रमात त्यांची प्रचार यंत्रणा हवेत राहिली. याचा ही मोठा फटका त्यांना बसला आहे. त्या खालोखाल संभाजी झेंडे यांनी ही प्रचार यंत्रणा बाहेरच्या लोकांना देऊन नियोजन केले होते. याचा ग्राउंड लेव्हलला काहीही फायदा झाला नाही. केवळ नात्यागोत्यांच्या प्रचारात ते गुंतून पडले. मात्र त्यांना मतदान मिळवता आले नाही. शिवतारे यांनी भाजपला बरोबर घेऊन अत्यंत सुनियोजन करीत प्रचार यंत्रणा रा बवली. आणि तीच त्यांना विजय मिळवून गेली. या निवडणूकीने हेच सिद्ध केले की पुरंदर हवेली हा शिवतारे यांचाच गड आहे.