पुणे : सध्या कोरोनामुळे शासनाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम विकास कामांवर होणार अससल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच आता पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी नागरिकांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी नव्याने पॅकेज तयार करण्यात येणार आहे. यासाठी आर्थिक मोबदल्यासोबतच काही प्रमाणात शेतकी महामंडळाची शेत जमीन देता येते का याबाबत चर्चा सुरू असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार मंगळवार (दि.25) रोजी या प्रकल्पाला गती देण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. याबाबत राव यांनी सांगितले , पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी 60 गावातील सुमारे 2 हजार 832 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 6 हजार कोटींचा निधी लागणार आहे. या पूर्वीच विमानतळासाठी जमीन संपादित करताना बाधित लोकांना काय पॅकेज देता येईल यावर खूप चर्चा झाली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने चार वेगवेगळी पॅकेज देखील निश्चित केली होती. परंतु गेल्या चार-पाच महिन्यांत कोरोनामुळे सर्वच आर्थिक स्थिती बिघडली आहे. निधीची कमतरता लक्षात घेऊन पुरंदर विमानतळासाठी नव्याने पॅकेज तयार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राव म्हणाले, सध्या तीन पॅकेजवर चर्चा सुरू आहे. यात काही टक्के रोख रक्कम देणे, विमानतळ परिसरात विकसित जमीन देणे आणि काही प्रमाणात शेतकी महामंडळाची शेत जमीन उपलब्ध करून देणे. यासाठी मात्र कायद्यात बद्दल कारावी लागणार आहे. या संदर्भात येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता नव्याने पॅकेज तयार करणार: सौरभ राव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 9:34 PM
कोरोनामुळे आर्थिक पॅकेजला मर्यादा
ठळक मुद्देशेतकी महामंडळाची जमीन देण्याचा पर्याय विमानतळ उभारण्यासाठी 60 गावातील 2 हजार 832 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार