लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उपचार करून तरुण बरा होत नसल्याने घटस्फोट झालेल्या पत्नीने करणी केल्याचे सांगून त्याला मृत्यूची भीती घातली. त्याच्यावरील करणी काढण्यासाठी ४ विशेष कबुतरे घ्यावी लागतील, असे सांगून ६ लाख ८० हजार रुपये घेतले. पण यातून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी कुतुबुद्दीन नजमी (वय ५९, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) याला अटक केले आहे. त्याचा साथीदार हमिमुद्दीन राज मालेगाववाला (रा. कोणार्कपुरम सोसायटी, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी कोंढव्यातील ३६ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या ३८ वर्षांच्या भावाचा विवाह झाला होता. परंतु मूलबाळ नसल्याने त्याने पत्नीपासून फारकत घेतली होती. चार महिन्यांपूर्वी भावाला ताप आल्याने ते आजारी पडले होते. आजाराबाबतच्या विविध चाचण्या सामान्य आल्या. परंतु, ते कोणत्या कारणाने आजारी होते हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. त्यानंतर २५ नोव्हेंबरला ते कोंढव्याच्या फाकरी हिल्स येथे प्रार्थनेसाठी गेले असता तेथे हकिमउद्दीन राज मालेगाववाला भेटला.
त्याला भावाबद्दल सांगितल्यावर तो सायंकाळी कुतुबुद्दीन याला घरी घेऊन आला. भावाची चौकशी करून हज येथून आणलेले जमजमचे पाणी व करबलाची माती पाण्यात मिसळून पिण्यास दिली. त्यानंतर त्याने भावाच्या पत्नीचा फोटो पाहण्यासाठी मागितला. या ‘पत्नी’नेच त्याच्यावर काळी जादू केल्याचे सांगितले. त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो, अशी भीती घातली. घरातील आणखी दोन जण काळ्या जादूचा सावटाखाली असल्याचे सांगितले. मुंबई येथील ‘सैफी मेहेल’ ही विशेष कबुतरे काळ्या जादूवर उपचार करतात असे सांगून या कबुतरासाठी ६ लाख ८० हजार रुपये घेतले.
ही बाब त्यांच्या चुलत्यांना आणि आजीला कळविल्यानंतर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी सांगितले. कबुतरासाठी एवढे पैसे घेतल्याने फसवणुकीचा संशय आल्यानंतर त्यांनी कुतुबद्दीन यांच्याकडे जाऊन त्याला ‘कबुतरे नको’, असे सांगत पैसे परत मागितले. त्यातील ३ लाख रुपये त्याने परत केले. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांची मदत घेऊन याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पी. यू. कापुरे अधिक तपास करीत आहेत.