लोणावळा : जुना बाजार लोणावळा येथील महावीर गोल्ड या सराफ दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या तीन महिला व एका पुरुषाने दुकानातील तब्बल एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास घडली.याप्रकरणी दुकानमालक भावेश परमार यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन महिला व एक पुरुष हे सोने खरेदीसाठी दुकानात आले होते. त्यांनी सोन्याचे गंठण, पेंडल, टॉप्स अशा वस्तू पाहण्यासाठी मागविल्या. दुकानातील सर्वांचा डोळा चुकवत यामधील ६५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गंठण, २२ हजार ५०० रुपयांचे व्ही आकाराचे सोन्यांचे पेंडल व २५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे टॉप्स असा सुमारे एक लाख १३ हजार रुपये किमतीचा माल पळविला. या प्रकरणी सदर महिला व पुरुष या चारही जणांच्या विरोधात भादंवी कलम ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजशहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये चोरीची घटना कैद झाली असून, सदर चोरट्याचा शोध पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश शितोळे करीत आहेत.(वार्ताहर)
खरेदीच्या बहाण्याने लोणावळ्यात चोरी
By admin | Published: April 25, 2017 4:15 AM